Don’t rub salt in the wound of Farmers : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींची टीका
Buldhana विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्ता आल्यानंतर हे आश्वासन पाळले गेलेले नाही. यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
शिंगणे म्हणाले, “शेतकऱ्यांना मदत करता आली नाही, तरी चालेल; पण त्यांची खिल्ली उडवू नका. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम थांबवा.” “कर्जमाफी नाही, पण अपमान मात्र होतोय!”शिंगणे यांनी मंत्री कोकाटे यांच्या पूर्वीच्या वादग्रस्त विधानांचा पुनरुच्चार करत म्हटले की, “शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडे, लग्न करणे चुकीचे आहे का? नेत्यांच्या मुलांचे विवाह सोहळे भव्य असतात, त्यावर कोणी आक्षेप घेतलेला नाही. मग शेतकरी आपला आनंद साजरा करू शकत नाही का?”
ते पुढे म्हणाले, “शेतकरी संकटात आहे – निसर्गाच्या लहरीपणामुळे, उत्पादन खर्च वाढल्यामुळे, आणि योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे. तरीही हा जगाचा पोशिंदा कोणाकडे तक्रार करत नाही. शेतातून एखादे फळ कोणी तोडले तरी तो काही बोलत नाही. एवढी मोठी दानत शेतकऱ्यांकडे आहे.”
शिंगणे यांनी कोकाटेंच्या एका जुन्या विधानाचा संदर्भ दिला – “सर्व शेतकरी पहाटे लवकर उठत नाहीत, भिकारीही एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला.” तसेच, “कर्जमाफीच्या पैशांचा वापर साखरपुडे आणि विवाहासाठी होतो,” हे विधान अत्यंत अपमानकारक असल्याचे त्यांनी म्हटले.
महायुती सरकारने ‘लाडकी बहिण’ योजनेचे अनुदान वाढवण्याचे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ना अनुदान वाढले, ना कर्जमाफी झाली. “राजकारणात काही आश्वासने पाळली जात नाहीत, हे समजून घेता येईल. पण शेतकऱ्यांचा अपमान का?” असा सवाल समाधान शिंगणे यांनी उपस्थित केला.