Congress leader inspected the flood-affected areas : नदीकाठची शेतजमीन खरडून गेली, हेक्टरी एक लाखाच्या मदतीची मागणी
Akola अतिवृष्टीने राज्यभर थैमान घातले असून विदर्भातील शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये, तर नदीकाठच्या खरडून गेलेल्या शेतजमिनींसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या संदर्भात काँग्रेस प्रदेश कमिटीकडून स्थापन समितीने मूर्तिजापूर तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून पाहणी केली.
या समितीचे नेतृत्व माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी केले. त्यांनी दातवी, लाखपुरी, शेलू बोंडे, मंगरुळ कांबे, भेटोरी आदी गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर मूर्तिजापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी शासनावर जोरदार टीका केली.
Local Body Elections : अतिवृष्टी, पूरस्थितीचा फटका; निवडणुका पुढे ढकलल्या!
“शासन हे बोल घेवड्या सरकारप्रमाणे वागत असून, वेळकाढूपणा करत आहे. उद्योगपती आणि विमा कंपन्यांना मदत करण्यामागे सरकारचा कल आहे; पण शेतकऱ्यांसाठी मात्र उदासीनता आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस लढा देणार असून, जर तत्काळ मदत दिली नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल,” असा इशारा त्यांनी दिला.
समितीचा अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सादर केला जाणार असून, त्यानंतर राज्यपालांकडे समिती जाणार आहे. शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळावी यासाठी राज्यपालांशी चर्चा केली जाईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
या वेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप, यवतमाळचे अशोक बोबडे, अकोल्याचे अविनाश देशमुख, अतुल अमानकर, मूर्तिजापूरचे राजू जोगदंड, सोहेल शेख, अशोक दुबे, विनायक कावरे, बंडूभाऊ डाखोरे, गनिभाई अजमिरी, अनंता पांडे, सगीरभाई, इरफान डालेवाले यांसह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.








