maoist-commander-mrutyunjay-bhuiya-arrested-jharkhand-border-terror-end : तीन राज्यांच्या सीमावर्ती भागातील दहशतीचा अंत
Gadchiroli : झारखंड, छत्तीसगड आणि बिहार या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात दोन दशकांहून अधिक काळ दहशत माजवणारा जहाल माओवादी कमांडर मृत्युंजय भुईया ऊर्फ फारेश अखेर सुरक्षा यंत्रणांच्या सापळ्यात अडकला आहे. लातेहार जिल्ह्यातील बुढापहाड या दुर्गम डोंगराळ परिसरात लपून राहून अनेक हिंसक कारवाया करणाऱ्या या कुख्यात माओवादी नेत्याला १२ मार्च रोजी अटक करण्यात आली. ५० हून अधिक जवानांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या नक्षलवाद्याच्या अटकेमुळे झारखंडसह छत्तीसगड आणि बिहारच्या सीमावर्ती भागातील दहशतीचे एक काळे पर्व संपल्याचे मानले जात आहे.
मृत्युंजय भुईया याच्या डोक्यावर दहा लाखांपेक्षा अधिक रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तीन राज्यांतील सुरक्षा दलांसह राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी तो मोठे आव्हान ठरला होता. झारखंडमधील लातेहार आणि पलामू जिल्ह्यांच्या सीमावर्ती बुढापहाड परिसरात त्याने अनेक वर्षे आश्रय घेतला होता. केवळ झारखंडपुरता मर्यादित न राहता बिहारमधील गया जिल्हा, छत्तीसगडची सीमा आणि झारखंडमधील सारंडा जंगल या त्रिकोणी भागात त्याने माओवादी कारवायांचे जाळे पसरवले होते. त्याच्यावर खंडणी, हत्या, स्फोट, सुरक्षा जवानांवरील हल्ले यांसारख्या शंभरहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडूनही त्याच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
Nagpur Municipal corporation : आयुक्तांचे करवाढीचे संकेत, निर्णय टाकला स्थायी समितीच्या कोर्टात
गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस आणि सुरक्षा दल त्याच्या शोधात होते. मात्र घनदाट जंगल आणि डोंगराळ भागाची अचूक माहिती असल्यामुळे तो वारंवार सुरक्षा दलांना चकवा देण्यात यशस्वी होत होता. बुढापहाड परिसरात गेली तीन दशके माओवादी संघटनेचे वर्चस्व होते आणि त्या भागात प्रशिक्षण शिबिरेही घेतली जात होती. पोलिस किंवा सुरक्षा दलांना त्या भागात प्रवेश करणे अत्यंत कठीण मानले जात होते.
२०२२ साली केंद्रीय राखीव पोलिस दल, कोब्रा बटालियन आणि झारखंड पोलिसांनी संयुक्तपणे ‘ऑपरेशन ऑक्टोपस’ ही मोठी मोहीम सुरू केली. या मोहिमेचा उद्देश माओवादी संघटनांना चहुबाजूंनी वेढा घालून त्यांच्या हालचाली रोखणे हा होता. या कारवाईनंतर बुढापहाड परिसर मोठ्या प्रमाणात नक्षलमुक्त झाला. अनेक माओवादी ठार झाले तर काहींनी शरणागती पत्करली. मात्र सर्वाधिक वाँटेड असलेला कमांडर मृत्युंजय भुईया मात्र पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
दरम्यान, तो अधूनमधून जंगलाबाहेर येऊन धान्य व आवश्यक वस्तू घेऊन पुन्हा जंगलात परतत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. १२ मार्च रोजी तो धान्य घेण्यासाठी बाहेर येणार असल्याची गुप्त माहिती पोलिस अधीक्षक कुमार गौरव यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. यानुसार पोलिसांनी कारवाई करत तांदळाच्या गोणीसह मृत्युंजय भुईया आणि त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात यश मिळवले.
मृत्युंजय भुईया याचे नाव नक्षलवाद्यांमधील अत्यंत क्रूर कमांडर म्हणून ओळखले जात होते. २०१३ साली गढवा जिल्ह्यात त्याने रात्रीच्या सुमारास १३ सुरक्षा जवानांना जिवंत जाळल्याची भीषण घटना घडवून आणली होती. या घटनेनंतर नक्षलवादी संघटनेत त्याचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्याला झोनल कमांडर पद देण्यात आले. तो केवळ शस्त्र चालवण्यातच नव्हे तर लँडमाईन लावण्यातही तज्ज्ञ मानला जात होता. त्याने पेरलेल्या सुरुंगांमुळे अनेक जवान आणि नागरिकांचे प्राण गेले असल्याचे तपासात समोर आले आहे.
Pravin Datke : काय सांगता! नागपुरात ९० टक्के मोबाईल टॉवर्स अनधिकृत
पोलिसांनी मागील काही वर्षांत मृत्युंजयच्या नेटवर्कवरही मोठा आघात केला होता. त्याच्या साथीदारांपैकी मनीष यादव याला चकमकीत ठार करण्यात आले होते, तर कुंदन खरवार याला अटक करण्यात आली होती. तसेच प्रशासनाने त्याची सुमारे १४.२६ एकर जमीन जप्त करून त्याच्या आर्थिक स्रोतांवरही टाच आणली होती. या सर्व कारवायांमुळे त्याचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त झाले असून अखेर सुरक्षा यंत्रणांनी त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.








