Ajit Pawars big statement while the Maratha movement is in the news : मराठा आंदोलन चर्चेत असताना, अजित पवारांचे मोठे वक्तव्य
Mumbai : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण आझाद मैदानात सुरू आहे. आंदोलक सकाळपासूनच आक्रमक दिसत असून, त्यांनी सीएसटी परिसरातील मुख्य रस्ता जाम केला आहे. सरकार कोणत्याच सोयी-सुविधा देत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य करत महायुती सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना सांगितले की, “महायुती सरकार मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत सकारात्मक आहे. तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू असून, लवकरच समाधानकारक निर्णय होईल” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वीच मनोज जरांगे यांनी शिंदे-पवार यांचे कौतुक केले होते, तर फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे अजित पवारांच्या वक्तव्याने महायुतीत या प्रश्नावर गंभीरपणे चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
8th Pay Commission : आठवा वेतन आयोग लांबणीवर कर्मचाऱ्यांना मोठा धक्का !
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत अजित पवार म्हणाले, “कोर्टाने एक दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली होती. मुदतवाढ मिळाली असली तरी जरांगे पाटील बेमुदत उपोषणावर ठाम आहेत. कायद्याच्या चौकटीत राहूनच आंदोलन व्हायला हवे. न्यायालयाचे आदेश सर्वांनी पाळायला हवेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन दिल्याच्या आरोपावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “प्रत्येक समुदायाला न्याय मिळावा हे आमचे धोरण आहे. सरकार सर्व पक्ष आणि समित्यांच्या मदतीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.” राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट समिती गठीत असून, ती याबाबत सविस्तर चर्चा करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. मराठा आंदोलन तीव्र होत असताना अजित पवारांच्या वक्तव्यामुळे सरकार आरक्षणाच्या तोडग्यासाठी पुढाकार घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
____