Government delegation prepares for Maratha reservation : मराठा आरक्षणावर सरकारच्या शिष्टमंडळाची तयारी
Mumbai : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाचा आज श्रीगणेशा झाला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अंतरवली सराटी येथे महादेवाचे दर्शन घेऊन आणि बाप्पाची आरती करून जरांगे पाटील यांनी ठाम निर्धार व्यक्त केला. हायकोर्टाने मुंबईतील आंदोलनास नकार दिला असतानाही ते आपल्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र मुंबई गाठण्यापूर्वीच सरकारच्या स्तरावर तोडग्यासाठी हालचालींना वेग आला आहे.
जरांगे पाटील यांनी सकाळीच सरकारच्या हेतूंवर संशय व्यक्त केला. नवीन कायद्याच्या आधारे हायकोर्टात सरकारने धाव घेतली, पण त्याची साधी कल्पनाही आम्हाला देण्यात आली नाही. आम्हाला नोटीस न देता न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला, आमचे म्हणणे ऐकले गेले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. न्यायदेवता न्याय करेल, असा विश्वासही त्यांनी मांडला. हे सरकार हिंदुत्ववादी असल्याचा दावा करतं, मग मराठे हिंदू नाहीत का, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
Ganeshutsav 2025 : ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोष देशभरात उत्साह !
दरम्यान, सरकारने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्यही असतील. सरकारच्या प्रयत्नांची माहिती देऊन जरांगे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न होणार असल्याचे संकेत आहेत. समितीला न्यायमूर्ती शिंदे आयोगाच्या मुदतीत सहा महिन्यांची वाढ करण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे.
जरांगे पाटील यांनी मात्र स्पष्ट केले की चर्चा झाली तर ती बंद दाराआड होणार नाही. सरकारशी संवाद साधण्याची तयारी त्यांनी दाखवली असली तरी चर्चा सर्वांसमोरच व्हावी, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे सरकार आता कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईकडे कूच करत असताना आंदोलकांना आझाद मैदानावर मर्यादित संख्येने परवानगी देण्याच्या हालचालीही सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यासह पाच हजार जणांना ठराविक काळासाठी अटी-शर्तींसह आझाद मैदानात आंदोलनाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर मोर्चा थांबवण्याऐवजी तो नियंत्रित करण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, मुंबई गाठण्यापूर्वीच तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.