Government’s decision to grant 10 percent reservation to Maratha community is wrong, strong arguments in Bombay High Court : सरकारी नोकरीत आधीच जास्त प्रतिनिधित्व असताना मराठ्यांना आणखी आरक्षणाची गरजच काय ?
Mumbai : मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजाला स्वतंत्र एसईबीसी प्रवर्गातून १० टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिकांवर काल (२१ नोव्हेंबर) महत्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणीत याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील प्रदीप संचेती यांनी सरकारच्या भूमिकेवर थेट बोट ठेवणारा आणि निर्णयाच्या वैधतेला आव्हान देणारा जोरदार युक्तीवाद केला.
ओबीसी समाजाचा तीव्र विरोध शांत करण्यासाठी आणि राजकीय गणित साधण्यासाठी सरकारने मराठ्यांना स्वतंत्र १० टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय कायदेशीर व घटनात्मकदृष्ट्या पूर्णपणे अयोग्य आहे, असे मत संचेती यांनी न्या. रवींद्र घुगे, न्या. एन.ज. जामदार आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर मांडले. यासाठी संचेती यांनी सुप्रीम कोर्टाने जयश्री पाटील प्रकरणात दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचा उल्लेख केला. त्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांमध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकते हे स्पष्टपणे नमूद केले होते.
सरकारला हवे असल्यास मराठा समाजाला OBC उपविभागात आरक्षण देता आले असते. पण केवळ OBC समाजाच्या विरोधामुळे सरकारने अनावश्यकपणे एसईबीसीच्या नावावर नवीन १० टक्के आरक्षणाचा मार्ग स्वीकारला, असा दावा संचेती यांनी केला. यावर अधिक भर देताना संचेती यांनी सरकारी नोकरीतील मराठा समाजाचे प्रतिनिधित्व किती आहे, याची आकडेवारीही न्यायालयासमोर सादर केली. सरकारी सेवांमध्ये मराठा समाजाचे प्रमाण इतर मागासवर्गीयांपेक्षा आधीच अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Local Body Election : रवी–नवनीत राणांना भाजपच फेकून देईल, यशोमती ठाकूर कडाडल्या !
जेव्हा एखाद्या समाजाचे सरकारी व्यवस्थेत आधीच मोठे प्रतिनिधित्व आहे, त्या समाजाला पुन्हा आरक्षण देण्याची गरज काय? आरक्षण हे मागासलेल्या समाजासाठी असते, आधीच प्रबळ प्रतिनिधित्व असलेल्या समाजासाठी नव्हे, हा मुद्दा संचेती यांनी प्रभावीपणे न्यायालयासमोर मांडला. या मुद्द्यांमुळे सरकारच्या निर्णयाची कायदेशीर शाश्वतता तसेच हेतू या दोन्हीवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता पुढील सुनावणी अत्यंत निर्णायक ठरणार असून, या प्रकरणाकडे राज्याचे आणि विविध समाजघटकांचे लक्ष लागले आहे.








