nagpur-katol-sbl-company-massive-explosion-12-workers-dead-15-injured : 12 कामगारांचा मृत्यू, 15 जण जखमी, सुरक्षिततेकडे दुर्लक्षाचा आरोप
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. बारुद, डेटोनेटर आणि इतर स्फोटक साहित्य तयार करणाऱ्या युनिटमध्ये झालेल्या या स्फोटात 12 कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे, तर किमान 15 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्फोट इतका तीव्र होता की परिसरात मोठा आवाज झाला आणि काही अंतरावरील घरांनाही धक्का बसल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्फोटानंतर कंपनीच्या आवारात आग लागली असून अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीस, आपत्कालीन सेवा आणि जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमी कामगारांना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी हलवण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Operation Epic Fury : इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू
घटनेची माहिती मिळताच मृत कामगारांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार स्फोटक हाताळताना तांत्रिक बिघाड किंवा सुरक्षा प्रक्रियेत त्रुटी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, काटोलचे आमदार चरणसिंह ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देत मृतांची संख्या 15 पर्यंत जाऊ शकते, तर 20 हून अधिक जण जखमी असल्याचा दावा केला. कंपनीकडून सुरक्षिततेच्या नियमांकडे गंभीर दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुरेशी सुरक्षा साधने, प्रशिक्षण आणि आवश्यक खबरदारी न घेता कामगारांकडून धोकादायक काम करून घेतले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
विशेष म्हणजे, याच राऊळगाव परिसरातील कोतवालबड्डी शिवारात वर्षभरापूर्वी एशियन फायर वर्क या कंपनीतही मोठा स्फोट झाला होता. 16 फेब्रुवारी रोजी दुपारी फटाक्यांची वात तयार करताना झालेल्या त्या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला होता, तर दोघे जखमी झाले होते. त्या घटनेनंतरही सुरक्षा उपायांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
सध्याच्या घटनेमुळे नागपूर जिल्ह्यात औद्योगिक सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जिल्हा प्रशासनाने घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे संकेत दिले असून मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्याबाबत निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, संपूर्ण परिसर पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.








