Breaking

Minister Akash Fundkar : बांधकाम कामगारांची नोंदणी आता ऑनलाईन!

Registration of construction workers now online : ३६६ तालुका केंद्रांवर नूतनीकरणाची सुविधाही उपलब्ध

Akola : बांधकाम कामगारांना आता नोंदणी, नूतनीकरण आणि लाभांसाठी ऑनलाइन अर्ज कोठूनही सादर करता येणार आहे. मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आणि इतर प्रक्रियांसाठी कामगारांना आपल्या सोयीच्या दिवशी तालुका इमारत कामगार सुविधा केंद्रावर जाता येणार आहे. ही सुविधा सर्व बांधकाम कामगारांसाठी ५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू करण्यात आली आहे.

यासाठी ३६६ तालुका सुविधा केंद्रे स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर दररोज १५० अर्ज हाताळण्यात येणार आहेत, अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली. बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरण आणि लाभ वाटपासाठी एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली (IWBMS) ही ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हा स्तरावर जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्रांद्वारे ही सेवा दिली जात होती.

Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचं लक्ष प्रशासन दक्ष!

 

केंद्र शासनाच्या १९९६ च्या अधिनियमानुसार राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे प्रत्येक तालुक्यात तालुका इमारत कामगार सुविधा केंद्रे स्थापन केली असून राज्यभरात ३६६ केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे, असंही फुंडकर म्हणाले. राज्यात ८ नोव्हेंबर २०२४ पासून सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण ५ लाख १२ हजार ५८१ अर्ज ऑनलाइन पद्धतीने हाताळण्यात आले आहेत. सध्या अर्ज तालुका सुविधा केंद्रांवर भरले जात आहेत.

काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे कामगारांचा वेळ आणि रोजगाराचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. कामगारांचा वेळ आणि रोजंदारीचे नुकसान टाळण्याला प्राधान्य द्यावे. अर्ज भरताना अधिक सुलभता, शिस्तबद्धता आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सुधारित सूचना देण्यात आल्या आहेत.

Ideal Marriage : एक विवाह ऐसा भी! ना अंतरपाट-मंगलाष्टके, ना अक्षता!

कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले की, लाभ वाटप अर्जांसाठी काही कामगारांना २०२६ पर्यंतच्या तारखा मिळाल्या होत्या. त्या तारखा रद्द करून त्यांना तालुका स्तरावर जवळच्या उपलब्ध तारखा दिल्या जातील. त्याचप्रमाणे, जिल्हा मुख्यालय असलेल्या तालुक्यांसाठी अतिरिक्त तालुका इमारत कामगार सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

Maharashtra State Rural Livelihoods Mission : उमेदने 2 लाख 65 हजार कुटुंबात आणली आर्थिक समृद्धी!

जिल्हा सुविधा केंद्रातील पाच पैकी तीन कर्मचारी ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ म्हणून काम करतील. तर उर्वरित दोन कर्मचारी बांधकाम कामगारांच्या तपशील बदलाच्या कामांसाठी नियुक्त करण्यात येतील. सर्व प्रलंबित अर्ज ३१ मार्च २०२५ पूर्वी निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी मंडळ स्तरावर समन्वय कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती फुंडकर यांनी दिली.