Action will be taken against those hoarding seeds and fertilizers : खरीप नियोजन बैठकीत पालकमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा
Akola खरीपात शेतक-यांना बियाणे, खते आदी निविष्ठांचा सुरळीत पुरवठा व्हावा. कुठेही साठेबाजी होता कामा नये. साठेबाजी निदर्शनास आल्यास शासनाकडून कडक कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे दिला.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत जिल्हा खरीप नियोजनाबाबत बैठक नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्यासह विभागप्रमुख व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या परीक्षेत अमरावती जिल्हा नापास
पालकमंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, निविष्ठा विक्री व्यवहारात पारदर्शकता असावी. प्रत्येक कृषी केंद्रात खते, बियाणे आदी उपलब्धतेचे फलक लावावेत. शेतक-यांची फसवणूक होता कामा नये. लिंकेजचा आग्रह धरू नये. भरारी पथकांनी सजग राहून नियंत्रण ठेवावे. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील डीएपी खत आदी निविष्ठांची आवश्यकता राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत मांडून पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात अद्यापपर्यंत पीक कर्जाचे ३९ टक्के वितरण झाले आहे. वितरणाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे. एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये. कृषी पंपाच्या वीज जोडण्यांचे काम संथगतीने होत असल्याने बॅकलॉग वाढत चालल्याच्या तक्रारी आहेत. या कामाला गती द्यावी. ज्या कंपन्या काम करत नाहीत, त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
उमरा सर्कलमध्ये शेतक-यांना फळपीक विम्यापासून वंचित ठेवल्याच्या, तसेच तिथे पंचनाम्याची प्रक्रिया सदोष असल्याच्या तक्रारी आहेत. त्याची तपासणी करून जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई करावी, तसेच शेतकरी बांधवांना सद्य:स्थितीत देय असलेले १५ हजार रू. द्यावेत व उर्वरित रक्कम त्यांना मिळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल. अकोट तालुक्यातील ४ सर्कलमधील शेतक-यांना मदत निधी मिळण्याबाबत पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.