Resolve health problems in Melghat urgently : मंत्री प्रकाश आबीटकर यांचे निर्देश, आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी उपाययोजना
Amravati मेळघाटातील आरोग्यविषयक समस्या तातडीने सोडविण्याचे स्पष्ट निर्देश आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिले. अलीकडेच त्यांनी या भागाच दौरा केला. या दौऱ्यात दुर्गम भागातील प्राथमिक व ग्रामीण आरोग्य केंद्रांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. येत्या काळात मेळघाटातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य यंत्रणांची पाहणी करण्यासाठी झालेल्या या दौर्यात आमदार केवलराम काळे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, तहसीलदार जीवन मोरनकर, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे, सहायक संचालक भारती कुलवाल आदी उपस्थित होते.
Vijay Wadettiwar : महायुतीमध्ये अमित शाह यांना न माननारा एक गट !
मंत्री आबीटकर यांनी सांगितले की, “इतर ठिकाणी ज्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत, त्याच सुविधा मेळघाटातही निर्माण करण्यावर भर दिला जाईल. अचलपूर येथील ग्रामीण रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सुविधांमध्ये लवकरच वाढ केली जाईल. तसेच आरोग्य यंत्रणेने सकारात्मक राहून नागरिकांना उत्तम सेवा द्यावी.”
दौऱ्यादरम्यान मंत्री आबीटकर यांनी सकाळी हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आंतररुग्ण कक्ष, प्रयोगशाळा व औषध भांडाराची पाहणी केली. त्यांनी केंद्रातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून पाणी व वीजपुरवठ्याच्या तातडीच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांनी औषधी विभाग, आंतररुग्ण कक्ष, प्रसूतिगृह, शस्त्रक्रिया गृह, रक्तसाठा केंद्र आणि एक्स-रे केंद्राची पाहणी केली. “ग्रामीण आणि गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात,” यासाठी आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
हिरडा येथील अंगणवाडी केंद्राच्या पाहणीदरम्यान तेथील ४७ बालकांपैकी एकही बालक कुपोषित नसल्याची माहिती मिळाल्यावर मंत्री आबीटकर यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. “बालकांचे पोषण होण्यासाठी त्यांना आणि त्यांच्या मातांना सकस आहार पुरविण्यात यावा,” असे निर्देश त्यांनी दिले. त्याच वेळी लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वितरणही करण्यात आले.
बोरुगव्हाण येथील ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन मंत्री आबीटकर यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. “रस्ते आणि आरोग्य सुविधा अधिक चांगल्या करण्यासाठी शासनाची मदत मिळवून देण्याचे प्रयत्न केले जातील,” असे आश्वासन त्यांनी दिले.