Indranil Naik likely to join cabinet, talks on Sana Malik new responsibility : इंद्रनील नाईकांना कॅबिनेटची शक्यता, सना मलिकांना नवी जबाबदारी मिळण्याची चर्चा
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रीपदावरून जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या असून पक्षांतर्गत लॉबिंगला वेग आला आहे. उच्च न्यायालयाकडून माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला असला तरी त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद भविष्यात अडचणीत येण्याची शक्यता कायम आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या रिक्त मंत्रीपदासाठी पक्षात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून सध्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
माणिकराव कोकाटेंना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने त्यांच्यावरील राजकीय अनिश्चितता कायम आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्रिमंडळातील बदलांबाबत चर्चा रंगू लागली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्र्यांचा खांदेपालट होणार असल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
Nagar Parishad election : राज्यातील नगरपरिषद निवडणुकांत ईव्हीएमचा खोळंबा!
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी चुरस पाहायला मिळत आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे यांच्यासह काही आमदार मंत्रीपदासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. तसेच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि मावळचे आमदार सुनील शेळकेही या शर्यतीत असल्याचं बोललं जात आहे.मात्र काही प्रकरणांमुळे आणि सामाजिक समतोलाच्या राजकारणामुळे काही नावांवर पक्षात मतभेद असल्याचंही सांगितलं जात आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने एक वेगळा पर्याय पुढे आणल्याची चर्चा आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्याचा विचार राष्ट्रवादी करत असल्याची माहिती समोर आली आहे. माणिकराव कोकाटेंकडे असलेली खाती इंद्रनील नाईकांकडे सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंजारा समाजातील तरुण नेतृत्व म्हणून इंद्रनील नाईक यांना पुढे आणून विदर्भातील जनाधार अधिक मजबूत करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
Winds of defection : भाजप प्रवेशासाठी संजोग वाघेरे मुंबईकडे रवाना
इंद्रनील नाईक सध्या उद्योग, मृद व जलसंधारण, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण आणि पर्यटन अशा सहा महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. राष्ट्रवादीकडून विदर्भाला सध्या केवळ एकच राज्यमंत्री मिळालेला असल्याने त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन प्रादेशिक समतोल साधण्याचा पक्षाचा मानस असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, इंद्रनील नाईकांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळाल्यास त्यांचे राज्यमंत्रीपद रिक्त होणार आहे. या रिक्त पदावर मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक यांना संधी देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे. सना मलिक यांच्या रूपाने मुस्लिम, महिला आणि तरुण या तिन्ही घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्र्यांचा खांदेपालट आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची दाट शक्यता असून, या घडामोडींकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचं लक्ष लागून राहिलं आहे.
__








