gram-sevak-ganesh-payghan-suspended-for-corruption-in-kolwad-gram-panchayat : कोलवड ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार, ग्रामसेवक निलंबित
Buldhana बुलढाणा शहराजवळील कोलवड ग्रामपंचायतीमध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवर तब्बल १२ लाखांहून अधिक रकमेचा डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ग्रामसेवक गणेश पायघन यांना दोषी धरून प्रशासनाने त्यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड चालवली आहे. शासकीय निधीचा वैयक्तिक कामासाठी विनियोग केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ग्रामसेवक गणेश पायघन यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे बँक स्टेटमेंट आणि दप्तर तपासणीवरून समोर आले आहे. पंधराव्या वित्त आयोगाची रक्कम प्रथम संबंधित पुरवठादारांच्या (वेंडर) खात्यात जमा करण्यात आली. त्यानंतर या वेंडरच्या खात्यातून तब्बल ११ लाख ५५ हजार रुपये पायघन यांनी स्वतःच्या आणि आपल्या नातेवाइकांच्या बँक खात्यात वळवून घेतले. प्रत्यक्ष कोणतीही कामे न करता केवळ बोगस बिले तयार करून खर्चाची नोंद दाखवण्यात आली. ग्रामपंचायतीच्या नमुना क्रमांक ५ मध्ये या कामांची कोणतीही अधिकृत नोंद आढळून आली नाही.
गणेश पायघन यांच्याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी सखोल चौकशी केली. पायघन यांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक ठरले. अखेर महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, १९६७ मधील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी त्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गणेश पायघन यांच्याकडे लोकसंख्येने मोठ्या असलेल्या रायपूर गावाचाही अतिरिक्त प्रभार होता. तिथेही त्यांच्या कार्यकाळात अनेक आर्थिक अनियमितता झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. कोलवड प्रकरणाच्या चौकशीनंतर आता रायपूरमधील त्यांच्या कामांचीही फेरचौकशी होण्याची दाट शक्यता आहे.
Maharashtra politics : ‘माझ्यासारखे २४२ आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे’
पंचायत राज व्यवस्थेत थेट केंद्र सरकारकडून येणाऱ्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवर असा डल्ला मारला गेल्याने संताप व्यक्त होत आहे. पायघन यांच्यावरील या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर भ्रष्ट ग्रामसेवकांचे धाबे दणाणले असून, विकासकामांच्या नावाखाली होणाऱ्या लुटीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.








