Hunger protest by women village council members at the Panchayat Samiti : तक्रारीला केराची टोपली; महिला ग्रामपंचायत सदस्यांचे पंचायत समितीसमोर उपोषण
Lonar तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील तांडा वस्ती सुधार (तांडा समृद्धी) योजनेअंतर्गत करण्यात आलेली सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे व सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून, त्यामागे वैयक्तिक लाभाचा हेतू व मोठ्या प्रमाणात निधी गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्या नंदा परमेश्वर राठोड यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा परिषद बुलढाणा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, तक्रारीची दखल न घेता संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्यात आल्याचा आरोप करत अखेर राठोड यांनी लोणार पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, तांडा समृद्धी योजनेअंतर्गत सिमेंट रस्त्यासाठी प्राप्त निधीचा गैरवापर झाल्याने सदर रस्त्याचे देयक (बिल) तत्काळ रद्द करून संबंधित ठेकेदारास अदा करू नये, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच सार्वजनिक शौचालयाचे बांधकामही निकृष्ट दर्जाचे असल्याने त्या कामाचे बिल देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली होती.
Water Shortage : कोट्यवधींच्या योजना कागदावरच; पाणीटंचाईचा कहर!
याशिवाय, चिखली येथील संबंधित ठेकेदाराने देऊळगाव कुंडपाळ येथे मागील पाच वर्षांत केलेली सर्व कामे निकृष्ट दर्जाची असून, त्यामध्ये शासनाच्या निधीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराच्या सर्व कामांची जिल्हास्तरावरून सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतेही बिल अदा करू नये, अशी ठाम मागणी करण्यात आली होती.
या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांसमवेत उपोषणास बसण्याचा निर्णय सौ. राठोड यांनी घेतला आहे.
दरम्यान, आपण महिला असूनही तक्रारीची चौकशी न करता संबंधित ठेकेदाराला प्रशासनाकडून संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करत, ठेकेदाराच्या नातेवाईकांकडून आपल्यासह कुटुंबीयांच्या जिवितास धोका असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. उपोषण काळात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.








