बुलढाणा
The grass brought for the government project was burnt : वृक्षलागवडीत खोडा; विकासकामांत अडथळ्याचा आरोप
मियावाकी जंगल प्रकल्पात साडेतीन एकरात वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. या वृक्षांच्या राेपांवर आच्छादनासाठी आणलेले गवत अज्ञाताने पेटवून दिले. ही घटना माेताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली येथे घडली. या प्रकरणी पाेलिसात तक्रार करण्यात आली आहे. सुमारे दीड लाख किमतीचे हे गवत होते. सरकारी प्रकल्पासाठी आणलेले गवत जाळल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. विकासकामांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही होत आहे.
सिंदखेड लपाली येथील मियावाकी जंगल परिसरात भंडारा येथून गवत आणण्यात आले हाेते. दीड लाख रुपयांचे हे गवत हाेते. या गवताला अज्ञात आराेपीने 1 जानेवारी राेजी सायंकाळी आग लावली. या आगीत गवत जळून खाक झाले. त्यामुळे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
धामणगाव बढे पोलिस स्टेशनचे ठाणेदार नागेश जायले यांना सरपंच प्रवीण कदम यांनी तत्काळ माहिती दिली. गावकरी गवत पेटविणाऱ्या भामट्याचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे मियावाकी जंगल प्रकल्पांतर्गत सुमारे साडेतीन एकरांत तिसऱ्या टप्प्याची वृक्षलागवड सिंदखेड येथे नुकतीच करण्यात आली आहे. शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षलागवड करत गेल्या दहा वर्षात सिंदखेडचे सरपंच प्रवीण कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच गावकऱ्यांनी ओसाड ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल निर्मिती केली आहे.
विकासाचा रथ धावत राहणार
‘विकासकामांत अडथळा आणू पाहणाऱ्यांच्या अशा भेकड कृत्यांनी आम्ही डगमगणार नाही . गावाच्या विकासाचा रथ यापुढे अधिक वेगाने पुढे नेला जाईल’, अशी संतप्त प्रतिक्रिया सरपंच प्रवीण कदम यांनी दिली आहे.
साडेतीन एकरात वृक्षलागवड
सिंदखेड लपाली येथे साडेतीन एकरात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्यातील वृक्ष लागवडीसाठी हे गवत आणण्यात आले हाेते. त्याला अज्ञात आराेपीने आग लावली. यात दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. धामणगाव बढे पाेलिसांत घटनेची तक्रार देण्यात आली आहे.