MLA Nitin Deshmukh : अधिकाऱ्यांच्या मुजोरीचा आमदाराला फटका, सभा तहकूब करण्याची वेळ

Confusion in the invitation leads to resentment among villagers and public representatives : निमंत्रणातील गोंधळामुळे ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी

Akola लोकप्रतिनिधींपेक्षा प्रशासकीय अधिकारी वरचढ ठरू लागल्याचा आणखी एक नमुना अकोला जिल्ह्यात बघायला मिळाला. त्याचा फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांना बसला. पातूर तालुक्याच्या वतीने दिग्रस बु. येथे आयोजित वार्षिक आमसभा प्रशासनाच्या निष्काळजीमुळे सुरू होण्यापूर्वीच तहकूब करण्याची वेळ आली. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबरोबरच निमंत्रणातील गोंधळामुळे ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.

सोपीनाथ महाराज संस्थान येथे ही सभा आयोजित करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही सरपंचांना निमंत्रण देण्यात येते; मात्र अनेक सरपंचांना निमंत्रणच मिळाले नसल्याने त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. त्यातच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारीही गैरहजर राहिल्याने सभा सुरू करण्यास अडचण निर्माण झाली.

Chandur railway Municipal council : नगराध्यक्ष आल्याशिवाय लग्न करणार नाही; नवरदेवाचा हट्ट

सभेचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी कार्यक्रमस्थळी आवश्यक व्यवस्था नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच महापुरुषांच्या प्रतिमा नसल्याने त्यांनी स्वागतासाठी देण्यात आलेली शाल आणि पुष्पहार स्वीकारण्यास नकार दिल्याची घटना घडली.

ग्रामस्थांच्या विविध समस्या मांडण्यासाठी ही सभा महत्त्वाची मानली जाते. मात्र, जबाबदार अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे एकही विषय चर्चेला न घेता सभा तहकूब करण्यात आली. यामुळे उपस्थित ग्रामस्थांमध्ये निराशा पसरली. दरम्यान, या प्रकारावर नाराजी व्यक्त करत आमदार देशमुख यांनी भविष्यात अशा त्रुटी टाळण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या.