MLA takes initiative to stop sand smugglers : अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या; प्रशासनाचे होते दुर्लक्ष
Amravati अचलपूर उपविभागातील विविध भागांमध्ये वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण तायडे MLA Pravin Tayade यांनी बुधवारी सकाळी परतवाडा-आसेगाव मार्गावर काही वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकची तपासणी केली. त्यांनी स्वतः वाहनधारकांकडून कागदपत्रे मागवून त्यांची पाहणी केली. या कारवाईमुळे महसूल आणि पोलिस प्रशासनाची कार्यक्षमता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
तपासणीदरम्यान अनेक ट्रक वाळूने भरलेले होते, मात्र त्यांच्याकडे रॉयल्टीची पावती नव्हती किंवा चुकीचे दस्तऐवज सादर करण्यात आले होते. यामुळे वाळूच्या अवैध वाहतुकीला स्थानिक प्रशासनाचे मौन पाठबळ असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे, अचलपूर-चांदूरबाजार तालुक्यातील निंभारी वाळू डेपोच्या नावावर तामसवाडी, तळणी, टाकरखेडा, असदपूर या गावांतील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याचे समोर आले आहे.
Liquor ban : दारूबंदी जिल्ह्यात पकडली कोट्यवधींची देशी-विदेशी!
ट्रक चालकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रॉयल्टी पासवर ५ ते ६ वेळा फेऱ्या केल्या जात आहेत. यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. आमदार तायडे यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या कारवाईचे नागरिकांनीही स्वागत केले असून, वाळू माफियांवर लगाम घालण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे, आमदारांच्या निर्देशानंतर प्रशासनाने तपासणी सुरू केली असून, लवकरच आणखी अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आमदार तायडे यांनी केली आहे.