Citizens are suffering due to electricity problems : नागरिकांच्या तक्रारी ऐकून संबंधित भागात जाऊन उपाययोजना करण्याचे दिले निर्देश
Amrawati ग्रामीण आणि शहरी भागातील वीज समस्यांमुळे त्रस्त नागरिकांच्या तक्रारींचा महापूर महावितरण अधिकाऱ्यांवर कोसळला. महावितरणच्या अकार्यक्षमतेबद्दल संतप्त आमदार रवी राणा यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत, नागरिकांच्या समस्या तातडीने संबंधित भागात जाऊन सोडवण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
वीजपुरवठा तासन्तास खंडित होणे, वीज गेल्यावर कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद न मिळणे, लोंबकळत्या विद्युत तारांचे धोके, कोसळणारे खांब आणि स्मार्ट मीटर प्रकरणी बेकायदेशीर पैसे उकळणी याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आक्रोशात बदलल्या. त्याची गंभीर दखल घेत रवी राणा यांनी गुरुवारी विद्युत भवन येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
Mahavitaran Akola : महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी भर पावसात केली दुरुस्ती!
या आढावा बैठकीला महावितरणचे मुख्य अभियंता अशोक साळुंके, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, तसेच कार्यकारी अभियंते आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार राणा यांनी सौर कृषिपंप योजना, सूर्यघर योजना आणि मेळघाटातील वीज व्यवस्था यांचा आढावा घेतला.
बडनेरा, साईनगर, एमआयडीसी, अंजनगाव बारी, वडाळी, राजुरा आणि मोगरा (पारधी बेड्यावरील) वीज समस्यांबाबत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना “प्रत्यक्ष जाऊन पाहणी करा व दोन दिवसांत उपाययोजना करा,” अशा स्पष्ट सूचना दिल्या.
शहरात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम बाह्य यंत्रणेला दिले असून, संबंधित कर्मचाऱ्यांकडून नागरिकांकडून ५०० ते १००० रुपये वसूल केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. विशेषतः एमआयडीसी परिसरात असे प्रकार घडल्याचे निदर्शनास आले असून, यावर राणा यांनी संबंधित दोषींवर एफआयआर दाखल करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
Kirit Somaiya : किरीट सोमय्यांची अकोला मनपा आयुक्तांना दहा दिवसांची मुदत
‘कॉल उचला, नाहीतर रेंज नसलेल्या भागात पाठवू!’
महावितरणचे कर्मचारी कॉल उचलत नाहीत किंवा नागरिकांना वेळेत मदत करत नाहीत, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आल्या. त्यावर आमदार राणांनी ताशेरे ओढत म्हटले, ‘जर कर्मचारी नागरिकांचे कॉल उचलत नसतील, तर त्यांना मोबाईल रेंज नसलेल्या भागात कामावर पाठवा.’ तसेच, प्रत्येक भागासाठी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक नागरिकांसाठी प्रसिद्ध करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.