Fasepardhi community’s sit-in in front of the MLA’s house : मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाची भेट घ्यावी, मागण्यांसाठी केले आंदोलन
Amravati राज्यात फासेपारधी समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित असतानाच या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ आदिवासी फासेपारधी समाज संघटनेच्या वतीने शुक्रवारी आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शंकरनगर परिसरात झालेल्या या आंदोलनात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी आमदार राणा यांना लेखी निवेदन दिले. त्यामध्ये फासेपारधी समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा घडवून आणावी, अशी मागणी करण्यात आली. समाजाच्या विविध मागण्या न्याय्य असून त्यांची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
मुख्य मागण्यांमध्ये फासेपारधी समाजाच्या आर्थिक विकासासाठी स्वतंत्र ‘शहीद समशेरसिंग भोसले फासेपारधी आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करणे, समाजासाठी राज्यस्तरीय विशेष पॅकेजची निर्मिती करणे, तसेच अमरावती जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी दरवर्षी आदिवासी विकास विभागाला १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणे, या बाबींचा समावेश आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याआधीही शासन दरबारी वारंवार मागण्या सादर केल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कृती झाली नसल्याने सरकारकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी सांगितले.
Local body Elections : आत्ता निघाले पक्ष मजबूत करायला, शक्य आहे का ?
या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी आंदोलकांशी संवाद साधला. त्यांनी फासेपारधी समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी लवकरच चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच समाजाच्या मागण्यांसाठी आपण सकारात्मक पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले, जिल्हाध्यक्ष बाबूसिंग पवार, अभय पवार, सागर पवार, श्यामदास भोसले यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडले.