MLA Ravi Rana appointed on assurance committee : आमदार रवी राणा यांची आश्वासन समितीवर नियुक्ती
Amravati राज्यातील महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा आमदार रवी राणा यांनी केली होती. पण आता त्यांची आश्वासन समितीवर नियुक्ती करून त्यांची मंत्रिपदाची तहान समितीवर भागवण्याचा प्रयत्न महायुती सरकारने केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र विधिमंडळाच्या २०२४-२५ या कार्यकाळासाठी विविध समित्यांची निवड करण्यात आली. त्यात युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांना आश्वासन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले.
Udhhav Balasaheb Thakrey : महावितरण कार्यालयात वाळलेल्या मक्याचा पेंढा फेकला!
ही नियुक्ती म्हणजे आमदार रवी राणा यांची निव्वळ बोळवण असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. विधानमंडळ समित्यांची स्थापना कार्यकारी प्रशासनावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात येते. सभागृहात मंत्र्यांकडून दिली जाणारी आश्वासने व अभिवचने प्रशासनाने पूर्ण केली की नाही. यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आश्वासन समितीवर असते.
विधानसभा आश्वासन समितीची स्थापना २ डिसेंबर १९५९ रोजी लोकसभेच्या धर्तीवर झाली. तिची मुदत एक वर्ष असते. यावेळी आ. रवी राणा यांच्याकडे या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मात्र, मंत्रिपदाच्या शर्यतीत असूनही त्यांना संधी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. भाजपने मंत्रिपद न देता केवळ समिती अध्यक्षपद देऊन शांत केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी राजकीय समीकरणांवर या निर्णयाचा परिणाम होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.