Breaking

MLA Sanjay Gaikwad : उशीर झाला तर हाती काहीही लागणार नाही!

 

Anonymous letter alleges threat to MLA’s son’s life : आमदार गायकवाड यांना निनावी पत्र; मुलाच्या जीवाला धोका अल्याचा दावा

Buldhana शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना त्यांच्या थोरल्या पुत्राच्या जीवाला धोका असल्याचा थेट इशारा देणारे निनावी पत्र प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे पत्र ५ एप्रिल रोजी आमदार गायकवाड यांच्या ‘मातोश्री’ जनसंपर्क कार्यालयात मिळाले. यासंदर्भात त्यांनी राज्याचे पोलिस महासंचालक तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करत तातडीने चौकशीची मागणी केली आहे.

या पत्रात आमदार गायकवाड यांचा मोठा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामध्ये दोन व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली असून, त्या दोघांमधील कथित बैठकीचा उल्लेखही करण्यात आला आहे.पत्र पाठविणाऱ्या व्यक्तीने स्वतःला या दोघांच्या निकटवर्तीय असल्याचे सांगत, स्वतःची ओळख गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे.

Sanjay Gaikwad : बुलढाणा जिल्ह्याला ‘जिजाऊनगर’ नाव द्या !

“तातडीने पावले उचला, उशीर झाला तर काही उरणार नाही”
पत्रात पुढे म्हटले आहे की, “तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी त्वरित पावले उचला; अन्यथा उशीर झाल्यावर काहीही हाती लागणार नाही.” हा थेट इशारा गायकवाड कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर मानला जात आहे. दरम्यान, पत्रात उल्लेख असलेल्या व्यक्तींचा आमदार गायकवाड यांच्याशी पूर्वीचा काही वाद असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले असून, पोलीस यंत्रणेसमोर सत्य बाहेर आणण्याचे आव्हान उभे राहिले आहे.