Breaking

MLA Sanjay Gaikwad : दाेन हजार रुपयांवर मतदार भाळले; म्हणाले, तुमच्यापेक्षा..

Controversial statement made about voters by Sanjay Gaikwad : मतदारांबाबत केले वादग्रस्त विधान

Buldhana MLA Sanjay Gaikwad विधानसभा निवडणुकीत काठावर मिळालेला विजय अद्यापही बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना पचनी पडलेला नाही. माेताळा तालुक्यातील एका कार्यक्रमात त्यांनी मतदारांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘दाेन हजार रुपयांत मतदार विकले गेले. मद्य, मांस आणि पैशांवर विराेधकांना मतदान केले,’ असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत आमदार गायकवाड यांना माेठ्या विजयाची आशा होती. पण त्यांचा फक्त ८४१ मतांनी विजय झाला. ‘दाेन हजार रुपयांत मतदार विकले गेले. मद्य, मांस आणि पैशांवर विराेधकांना मतदान केले. तुमच्यापेक्षा वारांगना बऱ्या,’ असं विधान करून गायकवाड यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जयपूर कोथळी ग्रामस्थांच्यावतीने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. ‘मागील विधानसभा निवडणुकीत झालेली लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होती. परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या भरवशावर मी विजय संपादित केला. हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित करताना मला आनंद होत आहे,’ असं ते म्हणाले.

माझी भूमिका ही लोककल्याणाची आहे. परंतु विरोधकांनी एकत्र येत धनशक्तीच्या जोरावर मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. मी जिंकलो नसतो तर लोककल्याणकारी योजनांची बिकट स्थिती झाली असती, असा दावाही त्यांनी केला.

आमदार गायकवाड यांची जीभ घसरण्याची ही पहिली वेळ नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासदर्भात बोलतानाही त्यांनी असाच वाद ओढवून घेतला होता. आमदार संजय गायकवाड यांचा या कार्यक्रमातील व्हिडीओ मात्र आता चांगलाच व्हायरल हाेत आहे. विराेधकांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली हाेती. तसेच काेराेना काळातही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले हाेते. आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.