Making Vijayraj Shinde an MLA is a big mistake : आमदार गायकवाड यांचा चिमटा; मोठे आरोप करत वातावरण तापवले
Buldhana “विजयराज शिंदे यांना आमदार करणे ही माझ्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती,” असे खळबळजनक वक्तव्य बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर थेट गंभीर आरोप करत जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे.
गायकवाड आणि शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. मात्र, या मुलाखतीत गायकवाड यांनी आरोपांची पातळी वैयक्तिक आणि कौटुंबिक क्षेत्रापर्यंत नेली. ते म्हणाले, “शिंदे हे गुरव समाजाचे होते. त्या काळात मराठा समाजाला उमेदवारी द्यायचा विचार होता, पण बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जात शिकवली नव्हती. म्हणून आम्ही विजयराज शिंदेंना तिकीट मिळवून दिले. मात्र, त्यांनी सहा महिन्यांतच मला संपवण्याचे काम सुरू केले.”
Prataprao Jadhav, Sanjay Gayakwad : जाधव-गायकवाड जगदंबेच्या दर्शनाला!
गायकवाड यांनी शिंदेंवर आरोप करताना म्हटले, “त्यांना मी कुठेही नको होतो. त्यांनी माझ्यावर MPDA अंतर्गत तडीपार कारवाई केली, माझ्या 94 वर्षांच्या आईवर 307 चा गुन्हा दाखल केला, पत्नीवर अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला, आणि अल्पवयीन मुलावरही गुन्हे लावले. त्यांनी मला संपवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले.”
शिंदे यांना पक्षात कोणी मोठं होऊ नये हीच इच्छा असल्याचा दावा करत गायकवाड म्हणाले, “मी ज्या पथावर गेलो, तिथल्या कार्यकर्त्यांना त्यांनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मी कोणाच्या प्रभावाखाली येत नाही, आणि कोणाला हे जड गेलं तरी मला पर्वा नाही.”
या मुलाखतीनंतर संजय गायकवाड आणि विजयराज शिंदे यांच्यातील राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचे वादळ उसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.