Provide special funds for Dalit settlements : आमदार पुराम यांची सामाजिक न्याय मंत्र्यांकडे मागणी
Gondia आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातील दलित वस्ती विकास, वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा आणि पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत अनेक समस्या आहेत. या संदर्भात आमदार संजय पुराम यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली.
आमगाव-देवरी मतदारसंघात अनेक दलित वस्ती आहेत. त्या अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, गटार व्यवस्थापन आणि आरोग्य सेवा यासारख्या सुविधांमध्ये दुरुस्तीची गरज आहे. अनेक ठिकाणी रहिवाशांना दैनंदिन समस्यांचा सामना करावा लागत आहे. आमदार पुराम यांनी या भागांमध्ये तातडीने सुधारणा होण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्याची मागणी केली.
मतदारसंघातील वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य राहण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, वाचनालये आणि खेळाची साधने यांची कमतरता असल्याचे निदर्शनास आले आहे. शिक्षणाच्या प्रवासात विद्यार्थ्यांना अडथळे येऊ नयेत यासाठी त्यांना दर्जेदार सुविधा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे आमदार पुराम यांनी नमूद केले.
वसतिगृहांमध्ये पुरवला जाणारा पोषण आहार अपुरा आणि निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी योग्य आणि पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी निवेदनाचा सकारात्मक विचार केला जाईल आणि लवकरच उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. दलित वस्ती आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुधारणा करण्यासाठी शासन पातळीवर लवकरच चर्चा करून ठोस निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
सामाजिक न्याय आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेल्या या महत्वपूर्ण प्रयत्नाबद्दल मतदारसंघातील नागरिक आणि विद्यार्थी वर्गाने आमदार संजय पुराम यांचे आभार मानले. शासनाने या विषयाला गांभीर्याने घेऊन तातडीने कृती करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आता सरकार यावर कोणते पाऊल उचलते, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.