Justice for Farmer Kailash Nagare’s family : कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी
Buldhana शिवणी आरमाळ येथील राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त प्रयोगशील शेतकरी कैलास नागरे (रा. शिवणी आरमाळ ता. देउळगाव राजा जि. बुलडाणा) यांनी होळीच्या दिवशीच आत्महत्या केली. ‘शेती आहुती मागते’, असे पत्र लिहून स्वतःचे आयुष्य संपवले. स्व. कैलास नागरे यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी सरकारने पूर्ण ताकदीने उभे राहिले पाहिजे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत केली.
त्यांचे कुटुंबीय व ते ज्या शेतकरी लोकांसाठी लढत होते त्यांना न्याय मिळाला पाहिजे. तीच कैलास नागरे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे खरात यांनी म्हटले. या विषयावर त्यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला. शासनाने त्वरित कैलास नागरे यांच्या तिन्ही मुलांचे पालकत्व स्वीकारावे, अशी मागणी त्यांनी केली.
त्याचवेळी नागरे यांच्या पत्नीला शासकीय नोकरी देण्यात यावी. खडकपूर्णा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून शिवनी आरमाळ सह चौदा गावांना पाण्याची सुविधा देण्यात यावी. त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची आर्थिक मदत करावी, या मागण्या शासनाकडे करण्यात आल्या.
वरील सर्व मागण्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण करून कैलास नागरे यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी मेहकर लोणार मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली. आमदार सिद्धार्थ खरात यांनी दोन दिवसांपूर्वी नागरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले होते.
Tension in Mahal Nagpur : नारेबाजी झाली नसती तर दंगल पेटलीच नसती!
विधानसभा व परिषदेतील सदस्य युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येवरून सरकारला जाब विचारत आहे. एक पुरस्कारप्राप्त युवा शेतकरी शेतीला पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या करतो. वारंवार प्रशासनाकडे पाण्याची मागणी करूनही त्याला पाणी दिले जात नाही. याकडे सरकारचे लक्ष आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.