Breaking

MLA Sulbha Khodke : प्रवाहाविरुद्ध कार्य करणे हीच परिवर्तनाची नांदी

Working against the flow is the beginning of change : एकल महिलांसोबत आमदारांचा संवाद

Amravati “आयुष्याच्या वळणावर आपल्या जीवनसाथीचे अकाली निधन दुःखद असते. मात्र, संपूर्ण आयुष्य पुढे असताना नव्या जीवनाची सुरुवात करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पुनर्विवाहाच्या माध्यमातून एकल व्यक्तींच्या जीवनवेलीला नवे फुल देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन केलेले कार्य हीच परिवर्तनाची नांदी ठरते,” असे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी केले.

मराठा, देशमुख, पाटील समाजातील विधवा, विधुर, घटस्फोटित आणि परित्यक्तांसाठी सावली ग्रुपच्या वतीने शनिवारी (दि. २२) पुनर्विवाह परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विवाहेच्छुक आणि त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Suicide in Amravati : आंतरजातीय विवाहाचा सात महिन्यांतच वेदनादायी शेवट

सावली ग्रुपच्या अध्यक्ष छाया देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “भारतीय संस्कृतीमध्ये पुनर्विवाहाची परंपरा पूर्वीपासून आहे. मात्र, समाजातील काही रुढी-परंपरांमुळे अनेकजण पुढे येण्यास कचरतात. समाजाला एकत्र आणून सुसंवाद घडवणे आणि पुनर्विवाहाच्या माध्यमातून सुखी संसार फुलवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.” मेळाव्यात विवाहेच्छुकांनी आपल्या नावाची नोंदणी करून सविस्तर परिचय दिला.

“पुनर्विवाह ही काळाची गरज आहे. रुढी-परंपरांचे जोखड तोडून समाजाने पुढे आले पाहिजे. एकमेकांच्या सहकार्याने आयुष्य सुकर होईल,” असे मत मान्यवरांसह उपस्थित विवाहेच्छुक आणि त्यांच्या पालकांनी व्यक्त केले.

मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. वैशाली गुडघे, प्रा. मनाली तायडे, पूजा देशमुख, शीतल देशमुख, पल्लवी देशमुख, सुचिता देशमुख, स्वाती देशमुख, कल्पना देशमुख आणि वैशाली देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. “समाजातील ऊर्जावान आणि उत्साही व्यक्तींनी असे विधायक उपक्रम राबविले, तर समाजात सकारात्मक बदल घडतील,” असे मत आमदार खोडके यांनी व्यक्त केले.

Crime in Nagpur : पत्नीचे affair, पतीने घेतला गळफास!

या प्रसंगी व्यासपीठावर आमदार सुलभा खोडके यांच्यासह श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलसचिव सी. डी. देशमुख, कल्याणचे माजी सहआयुक्त जी. डी. देशमुख तसेच मुंबई येथील समाजसेवक आदी उपस्थित होते.