BJP MLA alleges against Sanjay Rathod’s department : अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण केल्याचा संदीप जोशींचा दावा
Nagpur भाजपचे विधान परिषद आमदार संदीप जोशी यांनी महायुतीतील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या विभागावर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेतील अंतर्गत वादावर चर्चा सुरू झाली आहे. संदीप जोशी यांनी राठोड यांच्यावर थेट आरोप केलेला नसला तरीही त्यांच्या विभागात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा दावा केला आहे.
राठोड यांच्या मृद व जलसंधारण विभागाच्या कारभारावर भाजप आमदार संदीप जोशी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांची विभागात नियमबाह्य पद्धतीने नेमणूक केल्याचा आरोप जोशी यांनी लावला आहे. मंत्र्यांच्या दालनात दोन्ही विभागांतील सचिवांना बोलावून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
Sudhir Mungantiwar : अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरले मुनगंटीवारांचे जनसंपर्क वाहन
२०१७ पर्यंत राज्य शासनाकडे जलसंपदा असा एकच विभाग होता. त्यानंतर मृद व जलसंधारण तसेच जलसंपदा असे दोन विभाग झाले. अगोदरच्या जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांना नवीन कुठल्या विभागात जायचे आहे याबाबत ४५ दिवसांत विकल्प सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांनी तसे विकल्प शासनाकडे दिले होते. एकदा विकल्प सादर केल्यावर परत ते बदलता येणार नाहीत, असा नियम होता. त्यामुळे शासनाने यादी जाहीर केली होती व आक्षेप मागण्यात आले.
त्यानंतर यादी निश्चित झाली. मात्र पाच वर्षांनंतर आठ संबंधित अधिकाऱ्यांचे नाव जलसंपदा विभागातून काढून मृद व जलसंधारण विभागात टाकण्यात आले. यावरच जोशी यांनी आक्षेप घेतला आहे. या प्रकारामुळे पावणे चारशेच्या जवळपास लोकांच्या आस्थापनेत गडबड झाली. कुणी वरिष्ठ झालं तर कुणी ज्युनिअर झालं. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर एकप्रकारे अन्यायच झाला. या अन्यायाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे संदीप जोशी यांनी स्पष्ट केले.
Question raised in the Assembly Hall : महाराष्ट्र हा बोगस बियाणांचा अड्डा !
या प्रकरणात प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांनी गडबड केली व आर्थिक देण्याघेण्यातून आठ जणांचा विभाग बदलण्यात आला. २०२१ नंतर यात निश्चितपणे अनियमितता झाली आहे. विकल्प सादर करण्यास उशीर झाल्याचे कारण देत त्यांना मृद व जलसंधारण विभागात घुसविण्यात आले आहे, असा आरोप जोशी यांनी लावला.