New direction for urban development, various projects approved : शहरी विकासाला नवी दिशा विविध प्रकल्पांना मंजुरी
Mumbai : राज्यातील वाहतूक व्यवस्था आणि शहरी विकासाला नवी दिशा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यात घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर या प्रमुख शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्थेची जोड मिळणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
बैठकीत पुणे – लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे – लोणावळा कॉरिडॉर अधिक सक्षम होणार असून परिसरातील औद्योगिक, निवासी आणि व्यावसायिक विकासाला आवश्यक ती कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. पुण्यात वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासही या प्रकल्पाचा फायदा होईल. याचबरोबर पुणे मेट्रोच्या टप्पा-1 अंतर्गत बालाजीनगर – बिबवेवाडी आणि स्वारगेट – कात्रज या दोन नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे.
Parliament session : ‘30 दिवस तुरुंगात राहिल्यास पंतप्रधानांसकट मंत्र्यांना पद सोडावे लागणार’
मुंबईसाठी उपनगरीय रेल्वे सेवेत मोठ्या प्रमाणावर आधुनिकता आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास योजना एमयूटीपी टप्पा ३ आणि ३A अंतर्गत नवीन गाड्यांची खरेदी होणार आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल 268 पूर्ण एसी गाड्या उपलब्ध होणार असून या गाड्या मेट्रोप्रमाणे बंद दरवाज्याच्या आणि अत्याधुनिक सोयी – सुविधांनी सज्ज असतील. जुन्या विना – दरवाजाच्या गाड्यांना टप्प्याटप्प्याने हटवले जाणार असून प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळेल. विशेष म्हणजे तिकीट दर वाढवले जाणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर या गाड्यांची खरेदी सुरू होईल.
ठाणे आणि नवी मुंबईकरांसाठीही वाहतुकीचा नवा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान 25 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रोड उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे ठाणे, नवी मुंबई आणि परिसरातील औद्योगिक भागांना वेगवान दळणवळणाची सुविधा मिळणार आहे.
मुंबईकरांसाठी आणखी एक महत्वाकांक्षी प्रकल्प मंजूर झाला आहे. वडाळा डेपो ते गेटवे ऑफ इंडिया या 16 किलोमीटर लांबीच्या पूर्ण भूमिगत मेट्रो मार्गिकेला हिरवा कंदील मिळाला आहे. जवळपास ₹24,000 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून जपानच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेकडून निधी उपलब्ध होणार आहे. या मार्गिकेमुळे श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, हॉर्निमन सर्कल अशा महत्त्वाच्या ठिकाणांवरील वाहतूक कोंडी कमी होईल. याचबरोबर बेस्टसोबत संयुक्त विकास प्रकल्पांतर्गत व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभारला जाणार असून, त्यातून बेस्टला अतिरिक्त उत्पन्नही मिळणार आहे.
MLC Sandip Joshi : युवा मोर्च्याचा कार्यकर्ता ते महापौर अन् आता आमदार!
नागपूरसाठीही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शहरात नवीन रिंग रोड उभारणीस तसेच नागपुरात एक नवनगर वसविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे नागपूरच्या विकासाला नवी चालना मिळेल.
या सर्व प्रकल्पांमुळे राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वाहतुकीचा ताण कमी होणार असून औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.