Mohan Bhagwat : ब्राह्मण असणे ही कोणतीही विशेष पात्रता नाही!

Being-Brahmin-is-not-special-qualification-sangh-mohan-bhagwat : कोणत्याही जातीची व्यक्ती संघाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकते – सरसंघचालक

mumbai : मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘मुंबई व्याख्यानमाला’ या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची भूमिका, कार्यपद्धती आणि विविध सामाजिक विषयांवर सविस्तर मते मांडली. जातिव्यवस्थेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की संघामध्ये ब्राह्मण असणे ही कोणतीही विशेष पात्रता नाही आणि कोणत्याही जातीचा, अनुसूचित जाती किंवा जमातीतील व्यक्तीही संघातील सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो. संघाच्या सुरुवातीच्या काळात ब्राह्मण स्वयंसेवकांची संख्या अधिक होती, हे मान्य करतानाच त्यांनी संघ सर्व समाजघटकांसाठी कार्य करतो, असे ठामपणे नमूद केले.

संघाच्या निधीबाबत असलेल्या चर्चांवरही मोहन भागवत यांनी खुलासा केला. संघाला मोठ्या देणग्या किंवा बाह्य निधी मिळतो, हा गैरसमज असल्याचे त्यांनी सांगितले. संघाची संपूर्ण कार्यप्रणाली स्वयंसेवकांच्या सहकार्यावर चालते. प्रवासाच्या वेळी संघाचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये न राहता स्वयंसेवकांच्या घरीच थांबतात आणि त्यांच्याच सहकार्याने कामकाज पार पाडले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

India-US trade deal : भारत – अमेरिका अंतरिम व्यापार करारात शेतकऱ्यांच्या हितांना धक्का नाही

‘संघ प्रवासाची १०० वर्षे – नवीन क्षितिजे’ या विषयावर आयोजित या व्याख्यानमालेत जातिव्यवस्था, भाषा वाद, धर्मांतरण, घर वापसी, मुस्लिम वस्त्यांतील कामकाज आणि अवैध प्रवासी असे अनेक मुद्दे चर्चेत आले. भाषा वादावर बोलताना मोहन भागवत यांनी सांगितले की इंग्रजी भाषेबाबत संघाला कोणताही विरोध नाही. जिथे इंग्रजीशिवाय काम होऊ शकत नाही, तिथे तिचा वापर केला जातो. मात्र, मातृभाषा आणि हिंदी भाषेला प्राधान्य देण्याचा संघाचा प्रयत्न असतो, असेही त्यांनी नमूद केले.

मुस्लिम बहुल भागात काम करताना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करताना त्यांनी संयम राखण्याचा सल्ला दिला. अपशब्द ऐकायला मिळाले तरी प्रतिक्रिया देऊ नये, कारण त्यातून संघर्ष वाढतो, असे त्यांनी सांगितले. भाषा वादाला त्यांनी स्थानिक स्वरूपाची समस्या संबोधत समाजाने संवादातून मार्ग काढावा, असे मत व्यक्त केले.

घर वापसीच्या विषयावर बोलताना मोहन भागवत म्हणाले की धार्मिक विचार वेगवेगळे असू शकतात आणि त्यांचा आदर केला पाहिजे. स्वेच्छेने धर्म स्वीकारणाऱ्यांचा सन्मान करण्यात कोणतीही अडचण नाही. मात्र, जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात आलेल्या लोकांना त्यांच्या इच्छेनुसार पुन्हा मूळ धर्मात परत आणणे योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अवैध प्रवाशांच्या प्रश्नावर त्यांनी सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. देशात बेकायदेशीररीत्या राहणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना परत पाठवले पाहिजे, तसेच देशातील व्यवसाय आणि रोजगार भारतीय नागरिकांनाच मिळाले पाहिजेत, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, असे त्यांनी सांगितले.

Amravati municipal corporation : निवडणुकीनंतरही नेत्यांची कामे संपली नाहीत; पराभूतांसह इच्छुकांना नगरसेवक पदाचे वेध

या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टी, प्रशासकीय सेवा आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. अभिनेत्री अनन्या पांडे, दिग्दर्शक करण जोहर, अभिनेते जॅकी श्रॉफ तसेच ज्येष्ठ आयएएस अधिकारी मिलिंद म्हैस्कर आणि मनीषा म्हैस्कर या व्याख्यानमालेत सहभागी झाले होते. संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर आयोजित हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा ठरला.