MP orders action against sanitation contractors : स्वच्छता कंत्राटदारांवर कारवाईचे आदेश; चार कोटींचा खर्च जातो कुठे?
Amravati शहरातील कचरा संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया यावर दरमहा चार कोटींपर्यंत खर्च होत असतानाही अमरावतीत अस्वच्छतेचे चित्र आहे. याबाबत संताप व्यक्त करत खासदार बळवंत वानखडे यांनी प्रशासनाला झापले. “बैठका पुरे झाल्या, आता कृती करा,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारले आणि स्वच्छता कंत्राटदारांचे लाड थांबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
महापालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत खासदार वानखडे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी आयुक्त सचिन कलंत्रे यांनी खासदार वानखडे आणि माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांचे स्वागत केले. या वेळी मंचावर माजी महापौर मिलिंद चिमोटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक आदी उपस्थित होते.
खासदार वानखडे यांनी शहरातील विविध ठिकाणी साचलेल्या कचऱ्याचे मुद्दे उपस्थित केले. अकॅडमिक स्कूल, पठाण चौक, नेहरू मैदान, दसरा मैदान, फ्रेजरपुरा स्मशानभूमी, वडाळी, आकाशवाणी मैदान, ऑक्सिजन पार्क आदी भागांत कचरा डंप केला जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. नागरी वसाहतींमध्ये कचरा डेपो कोणाच्या परवानगीने उभारले, याचा जाब त्यांनी विचारला.
अमरावती शहरात पाच झोन आहेत, मात्र त्या झोनमधील प्रशासनाचे कंत्राटदार व सफाई कर्मचाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नाही. इतिहासात पहिल्यांदाच कचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटात मनुष्यबळाची अट शिथिल करण्यात आल्याचा आरोपही खासदारांनी केला. सर्व झोनमधील कामे मॅनेज करून देण्यासाठी महापालिकेची हेतूपुरस्सर भूमिका असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला.
Local Body Elections : अकोला व अमरावती महापालिका निवडणुका चार सदस्यीय प्रभाग प्रणालीनेच
प्रत्येक महिन्याला मालमत्ता कर वसुलीतून चार ते साडेचार कोटी रुपये जमा होतात, आणि ही रक्कम मुख्यतः स्वच्छतेसाठी वापरली जाते. तरीही परिस्थिती जैसे थे आहे. या प्रश्नावर माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनीही नाराजी व्यक्त केली.