There has been no meeting of the Disha Committee for a year : वर्षभरापासून बैठकच नाही, मिनी मंत्रालयाच्या योजनांचा खेळखंडोबा
Yavatmal गेल्या वर्षभरात दोनवेळा निवडणुका झाल्या. केंद्र सरकार, राज्य सरकारचा कार्यभार सुरू झाला. विजयाचे जल्लोष झाले. मिरवणुका झाल्या. पण दिशा समितीच्या बैठकांसाठी वर्षभरात लोकप्रतिनिधींना वेळ मिळाला नाही. विशेषतः यवतमाळ-वाशीमच्या खासदार महोदयांना तर याचा पूर्णपणे विसर पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याची दिशा समिती बरखास्त झाली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण विकास मंत्रालय, केंद्र सरकार अंतर्गतच्या जनकल्याणाच्या राज्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या माध्यमातून विशा समितीची बैठक दर तीन महिन्यात आयोजित केली जाते. त्या बैठकीमध्ये केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या ३५ योजनांचा आढावा घेतला जातो. त्यातून योजनांच्या विकास कामांना गती मिळते.
Nagpur Improvement Trust : एनआयटी बरखास्तीसाठी भाजप-काँग्रेस एकत्र!
मात्र जिल्ह्यात एक वर्षापासून दिशा समितीची जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समित्या (DISHA) बैठक झालेली नाही. जून २०२४ च्या निकालानंतर यवतमाळ-वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख हे दिशा समितीचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. मात्र त्यांच्या नऊ महिन्यांच्या कार्यकाळातही त्यांनी दिशा समितीच्या बैठक घेण्यास निरुत्साह दाखविण्यात आला. त्यामुळे योजनांच्या बैठकीतील आढाव्या अभावी ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गतच्या योजनाचा खेळखंडोबा झाला आहे.
खासदार संजय देशमुख दिशा समितीची बैठक लावण्याकरिता पुढाकार का घेत नाहीत? बैठक न घेण्यामागचा उद्देश काय? असेही प्रश्न आता जिल्ह्यातून उपस्थित होत आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्हातील दिशा समितीची बैठक नऊ जानेवारी २०२४ रोजी तत्कालीन खासदार भावना गवळी यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी घेण्यात आली होती.
त्यानंतर ४ जून रोजी लोकसभेचे निकाल जाहीर झाले, केंद्रातील सताक्षी गठण झाली. तरीही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांमध्ये दिशा समितीची बैठक घेण्यात आली नाही. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली व ५ डिसेंबर रोजी महायुतीची सत्ता स्थापन झाली. त्यानंतरही अडीच महिन्याचा कालावधी लोटलेला असताना, दिशा समितीची बैठक बोलविण्यात आलेली नाही.