Public cheated under the guise of the Transport Department : सेवांसाठी अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करण्याचे परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन
Buldhana परिवहन विभागाच्या नावाखाली सुरू असलेल्या बनावट वेबसाईट्स, फसव्या मोबाईल अॅप्स (एपीके), एसएमएस, व्हॉट्सॲप संदेश व खोट्या ई-चलन लिंकद्वारे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने नागरिकांना अधिक सतर्क राहून केवळ विभागाच्या अधिकृत शासकीय संकेतस्थळांचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, पत्ता बदल, ई-चलन भरणा आदी सेवांसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, याच सुविधांचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार नागरिकांना आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करत आहेत. अनेकदा “चलन प्रलंबित आहे, त्वरित भरा अन्यथा कारवाई होईल” किंवा “ड्रायव्हिंग लायसन्स रद्द/निलंबित होणार आहे” अशा भीतीदायक संदेशांद्वारे नागरिकांना खोट्या लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडले जाते.
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, विभागाकडून कधीही एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे पेमेंट लिंक पाठवली जात नाही, तसेच कोणतेही एपीके स्वरूपातील अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जात नाही. त्यामुळे “RTO Services.apk”, “mParivahan_Update.apk”, “eChallan_Pay.apk” यांसारखी अॅप्स डाऊनलोड करणे धोकादायक ठरू शकते. अशा अॅप्समधून ओटीपी, बँक खात्याची माहिती, युपीआय तपशील तसेच मोबाईलमधील वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याची शक्यता असल्याचे विभागाने नमूद केले आहे.
Municipal election : निवडणुकांचा बिगुल वाजताच भाजपमध्ये इच्छुकांची प्रचंड भाऊगर्दी
नागरिकांनी केवळ केंद्र शासनाच्या .gov.in डोमेनवरील अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करावा. त्यामध्ये—
• वाहन नोंदणीसाठी : vahan.parivahan.gov.in
• ड्रायव्हिंग लायसन्ससाठी : sarathi.parivahan.gov.in
• परिवहन सेवांसाठी : www.parivahan.gov.in
• ई-चलन भरण्यासाठी : echallan.parivahan.gov.in
Municipal election : 15 ला मतदान, 16 जानेवारीला निकाल, आजपासून आचारसंहिता
कोणताही संशयास्पद कॉल, संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास नागरिकांनी तात्काळ दुर्लक्ष करावे व तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सायबर फसवणुकीसंदर्भातील तक्रारींसाठी नॅशनल सायबर क्राईम पोर्टल cybercrime.gov.in तसेच सायबर फसवणूक हेल्पलाईन क्रमांक १९३० उपलब्ध आहे. याशिवाय जवळच्या जिल्हा सायबर पोलीस ठाण्यातही थेट तक्रार दाखल करता येईल, अशी माहिती प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत खराबे यांनी दिली आहे.








