Breaking

MSRTC : माटरगाव न जाता परतणाऱ्या बससमोर विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

Students protest by stopping buses : ग्रामस्थांचीही आंदोलनात उडी, अखेर निर्णय बदलला

Buldhana बुलढाणा आगाराची सायंकाळची फेरी उदयनगरहून पुढे माटरगाव (गेरू) न जाता थेट परतीस निघाल्याने विद्यार्थ्यांनी बससमोर ठिय्या आंदोलन करत बस माटरगाव घेऊन जाण्याचा आग्रह धरला. अखेर प्रवासी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या संतापामुळे ही बस माटरगावसाठी रवाना करण्यात आली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता उदयनगर बसथांब्यावर घडली.

माटरगाव हे ज्ञानगंगा अभयारण्यात वसलेले दुर्गम गाव असून तेथे जाण्यासाठी घाटमार्गावरील एसटी बस हीच एकमेव वाहतूक सुविधा आहे. शिक्षणासाठी येथील अनेक विद्यार्थ्यांना उदयनगर तसेच पुढे बुलढाणा-खामगावला जावे लागते. या मार्गावर बुलढाणा आगारातून दररोज ३ ते ४ फेऱ्या चालतात. बुलढाण्यातून सायंकाळी ४ वाजता निघणारी बस साधारण ५ वाजता उदयनगरला पोहोचून पुढे माटरगावला जाते.

Vanchit Bahujan Aghadi : गाय चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला मारहाण; मुख्य आरोपी अद्याप फरार

मात्र, काही दिवसांपासून ही सायंकाळची बस वेळेत पोहोचली नाही तर माटरगाव न जाता उदयनगरवरूनच माघारी फिरवली जात आहे, यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय वाढली आहे. ७ ऑगस्ट रोजी ९९४७ क्रमांकाची बस बुलढाण्यातून निघून उदयनगरला ५ वाजता पोहोचण्याऐवजी ६.१५ वाजता पोहोचली. तेव्हा ती परतीस निघत असताना विद्यार्थ्यांनी बस अडवून आंदोलन सुरू केले.

Vande Bharat train : शेगावला वंदे भारतचा थांबा, भाविकांना मोठा दिलासा

“आमचे गाव दुर्गम भागात आहे. उशीर झाला तरी घरी जाण्यासाठी हीच बस आहे, त्यामुळे माटरगावला नेलेच पाहिजे,” असा आग्रह विद्यार्थ्यांनी धरला. चालक व वाहकांनी “वरिष्ठांनी परत या” असे आदेश दिल्याचे सांगितले. मात्र, शिक्षक निलेश खरात, चव्हाण मामा व ग्रामस्थांनी बुलढाणा आगारातील पवार यांच्याशी संपर्क साधला असता, असे आदेश दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले व बस माटरगावला नेण्याचे निर्देश दिले.

Waqf Board lands : वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील रहिवाशांना पट्टे मिळणार !

विद्यार्थ्यांचा रोष आणि ग्रामस्थांच्या दबावामुळे अखेर ६.३० वाजता बस माटरगावसाठी रवाना झाली. दरम्यान, बुलढाणा आगारातून माटरगावसाठी सोडल्या जाणाऱ्या सर्व फेऱ्या थेट माटरगाव (गेरू) पर्यंत नेण्याची मागणी प्रवासी व ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.