Nine members of Yavatmal’s family returned safely : मुंबईहून परतल्यावर यवतमाळच्या कुटुंबाने सांगितली आपबिती
Yavatmal शहरातील पाटीपुरामधील एक कुटुंब मुलीच्या गृहप्रवेशासाठी मुंबईला गेले. आटोपल्यानंतर बोटीने ते एलिफन्टा लेणीची सफर करायला गेले. बोटीने नऊ जणांचा प्रवास सुरू झाला. अचानक नौदलाच्या स्पीड बोटीने त्यांच्या बोटीला धडक दिली. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेने महाराष्ट्र हादरला. पण यवतमाळचं अख्खं कुटुंब अक्षरशः मृत्युच्या दाढेतून परत आलं. विशेष म्हणजे या कुटुंबाने स्वतःचा जीव वाचवल्यावर इतरांचेही प्राण वाचवले. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
दिनेश भगवान अडकने मुंबईत वास्तव्य असलेल्या त्यांच्या मुलीच्या (वैशाली साबळे) गृहप्रवेशासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते गेट वे ऑफ इंडियाजवळ गेले. तेथून बोटीने लेणी पाहण्यासाठी निघाले. 18 डिसेंबरची ही घटना आहे. अचानक समोरून नौदलाची स्पीड बोट आली. त्या बोटीने फेरी बोटीला धडक दिली. काही कळायच्या आत प्रवासी बोट समुद्रात कलंडली. फेरी बोटीतील प्रवाशांची घाबरगुंडी उडाली.
अडकने कुटुंबातील काही सदस्य बोटीतून खाली फेकले गेले. मात्र, गांभीर्य ओळखून त्यांनी स्वतःचा जीव वाचविला. नंतर इतर प्रवाशांच्या मदतीसाठी ते सरसावले. हे कुटुंब यवतमाळमध्ये परतल्यानंतर 55 वर्षीय दिनेश अडकने यांनी बोट बुडाल्यानंतर नेमके काय घडले, याची माहिती दिली. काही प्रवासी नजरेसमोर बुडाले, तर काहींना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याचे त्यांनी सांगितले. शुभम आणि संगम अडकने यांनी अनेकांना वाचविण्यात यश मिळविले. या अपघातात दिनेश, त्यांची पत्नी नंदा यांना दुखापत झाली.
बोट उलटल्यानंतर कुटुंबातील सदस्यांकडे असलेले मोबाइल, पर्स, सोन्या-चांदीचे दागिने समुद्रात पडले. जखमी सदस्यांवर घाटकोपरमधील राजावाडीच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. चार दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाल्यावर हे कुटुंबीय यवतमाळमध्ये पोहोचले. त्यांनी सांगितलेली आपबिती अंगावर शहारा आणणारी ठरली.
इतरांचेही प्राण वाचवले
18 डिसेंबरला झालेल्या या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. या बोटीत दिनेश अडकने, त्यांची पत्नी नंदा, मुले शुभम आणि संगम, मुलगी वैशाली, मुलगी काजल, नातू शार्वीन, भाची नयना मुरमाडकर, वनमाला हे नऊ जण प्रवास करीत होते. अपघातानंतर बोटीतील रॉकेलमिश्रित पाणी नाकातोंडात गेले. तशा स्थितीत शुभम आणि संगम यांनी आई नंदासह इतर कुटुंबीयांना वाचविले. नंतर इतर प्रवाशांना वाचविण्यासाठी धाव घेतली.