Two arrested from Buldhana in case of threat to DCM : मुंबई क्राईम ब्रांचची देऊळगाव महीत कारवाई
Buldhana महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी बुलढाणा पोलिसांच्या सहकार्याने देऊळगाव मही येथे छापा टाकून दोन संशयितांना २० फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली आहे. अभय गजानन शिंगणे (वय २२) याने मंगेश अवचित वायाळ (वय ३५) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
धमकीचा ई-मेल अभय गजानन शिंगणे (वय २२) याने मंगेश अवचित वायाळ (वय ३५) यांच्या मोबाईलवरून खोडसाळ हेतूने पाठवल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. हे दोघे आपसातील वादातून एकमेकांना अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात होते. त्यातूनच ही बनावट धमकी ई-मेलद्वारे पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
हा धमकीचा ई-मेल मंत्रालयासह सात ते आठ पोलिस ठाण्यांनाही पाठवण्यात आला होता, त्यामुळे सुरक्षायंत्रणा सतर्क झाली. यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास करून देऊळगाव मही येथे शोधमोहीम राबवली आणि दोघा संशयितांना ताब्यात घेतले.
आरोपींना पुढील तपासासाठी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. हा प्रकार निष्पन्न झाल्यामुळे समाजात अशा प्रकारच्या खोडसाळ आणि दिशाभूल करणाऱ्या धमक्यांबाबत कठोर कारवाई होण्याची गरज असल्याचे सुरक्षा तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
चिखली विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनाही जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसेच पाेलिसात तक्रार देणार असल्याचे समजते.