Municipal Corporation Election : ‘मिले सूर मेरा तुम्हारा..’ नागपुरात ठाकरे–चतुर्वेदींची अनपेक्षित जुळवाजुळव !

Unexpected match between Vikas Thackeray and Satish Chaturvedi in Nagpur Congress : दोन दशकांचं वैर, अपमानाचे डाग आणि अंतर्गत बंड; तरीही महापालिका निवडणुकीत ‘एकता’ची नवी स्क्रिप्ट

Nagpur : नागपूरच्या काँग्रेसमध्ये जिथे एकेकाळी ‘घर घर में युद्ध’ सुरू होतं, तिथे अचानक ठाकरे–चतुर्वेदींचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा..’ ऐकू येऊ लागले आहे. ज्या दोन गटांमध्ये वैमनस्य इतके खोलवर गेले होते की शाईफेक, काळे फासणे आणि उघड बंड हेही नवीन नव्हतं, तिथे आज एकाच टेबलावर बसून महापालिका रणनिती ठरवली जात आहे. हे चित्र जितके आश्चर्यकारक, तितकेच राजकीयदृष्ट्या अर्थपूर्ण.

एकेकाळी विलास मुत्तेमवार आणि सतीष चतुर्वेदी हे नागपूर काँग्रेसचे ‘अटूट जोडीदार’ होते. पण लोकसभेच्या निवडणुकीत मुत्तेमवारांच्या पराभवाने ही जोडी तुटली आणि त्याचा परिणाम शहर काँग्रेसच्या दोन तुकड्यांत दिसला. त्यानंतर विकास ठाकरे, जे मुत्तेमवारांचे कट्टर समर्थक आहेत, त्यांनी चतुर्वेदी गटासोबत उघड युद्ध पुकारले. या संघर्षाने इतका उग्र रूप घेतले की अशोक चव्हाण यांच्यावरील शाईफेक प्रकरण हे आजही काँग्रेसच्या प्रतिष्ठेला काळा डाग ठरले आहे.

Local Body Elections : सावनेरची लढत तापली; अॅड. अरविंद लोधींच्या नगर विकास आघाडीचे पाऊल ठरणार निर्णायक !

त्या काळात चतुर्वेदी समर्थकांनी विकास ठाकरे यांच्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करून फोटोंना काळे फासून संपूर्ण शहरात थरार निर्माण केला होता. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चतुर्वेदी गटातील शिवसेनेत गेलेले कार्यकर्ते पुन्हा काँग्रेसच्या छत्राखाली येऊ लागले आहेत. याचा अर्थ एकच ‘शत्रुत्वात राजकारणाच्या फायद्याची शक्यता दिसली की वैर संपते.’ ठाकरे आणि चतुर्वेदी यांनी ‘भूतकाळाचा बोजा सोडूया..’ असा निर्णय घेतल्याचे दिसतेय.
परंतु प्रश्न असा आहे की, हे खरंच मनोमिलन आहे की फायद्याचा तात्पुरता करार?

Local Body Elections : उमेदवारीवरून राजकीय पक्ष अजूनही संभ्रमात; प्रभाग पुनर्रचनेमुळे वाढली गुंतागुंत !

काँग्रेसची आजची परिस्थिती अशी की अंतर्गत फुटीमुळे पक्षाची नागपूरमधील ताकद ढासळली आहे. भाजपची मजबूत पकड आणि इतर पक्षांची वाढती उपस्थिती लक्षात घेतली तर काँग्रेसकडे एकच पर्याय उरतो, तो म्हणजे आतील भांडणं थांबवून एकत्र लढणे. म्हणूनच ही ठाकरे–चतुर्वेदी अनपेक्षित जुळवाजुळव निर्माण झाल्याचे दिसतेय.

या ‘मिले सूर’ला जनता किती स्वीकारते आणि कार्यकर्त्यांना किती पचते, हा खरा प्रश्न आहे. कारण वर्षानुवर्षे एकमेकांची राजकीय, सार्वजनिक बदनामी करणारे दोन गट अचानक हातात हात घालून उभे राहतात, तेव्हा जनता याकडे एकतेपेक्षा निवडणूकपूर्व स्वार्थसंघटन म्हणूनच पाहते. महापालिकेच्या रणांगणात हा ‘नवा सूर’ काँग्रेसला कितपत संगीत देतो की शंखनाद होतो, हे येणारे दिवसच सांगतील.