BJP will have to do some serious math in ticket distribution Municipal Corporation Elections : नव्या चेहऱ्यांमध्ये उत्साह तर माजी नगरसेवक चिंतेत,| भाजपला तिकीट वाटपात मोठी गणित मांडावे लागणार
Nagpur : जवळपास चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या हालचालींना अखेर वेग आला आहे. आरक्षण जाहीर होताच राजकीय गोट्यांमध्ये तिकीटांसाठीची चुरस चांगलीच वाढली आहे. आरक्षणातील फेरबदलांमुळे काही माजी नगरसेवकांचे राजकीय समीकरण कोलमडले आहे, तर अपेक्षित आरक्षण मिळाल्याने नव्या चेहऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आरक्षणानंतर शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने आंतरिक आढावे, मतदारसंघनिहाय मोजमाप आणि समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. काही पक्षांनी प्राथमिक उमेदवार यादी तयार करण्याचाही उपक्रम सुरू केला आहे. अनेक इच्छुकांनी स्थानिक पातळीवर आपला प्रचारही सुरू केला आहे.
आरक्षणातील बदलामुळे काही प्रभाग महिलांसाठी किंवा मागासवर्गीयांसाठी राखीव झाल्याने अनेक माजी नगरसेवकांना त्यांच्या पारंपरिक जागांवरून दावेदारी करता येणार नाही. त्यामुळे काहींनी इतर प्रभागांवर उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे. मात्र, नव्या चेहऱ्यांसाठी हे बदल सुवर्णसंधी ठरत आहेत. अनेक तरुण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पक्षांशी संपर्क साधून आपली इच्छापत्रे दाखल केली आहेत.
भाजपसमोर मोठा पेच..
मागील कार्यकाळात महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक भाजपचे होते. त्यामुळे यावेळी तिकीट वाटपात भाजपसमोर मोठी अडचण निर्माण झाले आहे. मागील निवडणुकीत कामगिरी केलेल्या नगरसेवकांचे आरक्षणामुळे बिघडेलेले गणित जुळवावे कसे आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी की नाही, या द्विधा मनःस्थितीत पक्ष नेतृत्व आहे. विशेष म्हणजे, आरक्षण बदलाचा सर्वाधिक फटका भाजपलाच बसणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
NCP Ajit Pawar : ताजबाग पुलाच्या सौंदर्यीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘अस्मिता एल्गार’
राजकीय तापमान वाढतेय..
आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांत अंतर्गत राजकारण आणि गटबाजीचे स्वर तीव्र झाले आहेत. तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक नेत्यांनी आपापल्या गटप्रमुखांना भेटी देण्यास आणि ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांबाबतही चर्चा सुरू आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल जानेवारी २०२५ मध्ये वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, प्रत्येक पक्षात तिकीट कोणाला, हा प्रश्न चर्चेचा मुख्य विषय बनला आहे.
एकूणच, आरक्षणाच्या फेरीनंतर महानगरपालिका निवडणुकीच्या तिकिटांसाठी सुरू झालेली राजकीय धावपळ येत्या काही दिवसांत अधिक तीव्र होणार असून, पक्षनिहाय समीकरणे आगामी निवडणुकीचे चित्र ठरवणार आहेत.








