Municipal Council Election : अनुकूल वातावरण असूनही भाजप अपयशी

Congress makes a decisive push, overcoming factionalism : गटबाजीवर मात करत काँग्रेसची निर्णायक मुसंडी

Malkapur केंद्रात, राज्यात तसेच मतदारसंघातही भाजपचे वर्चस्व असताना, विधानसभेच्या निवडणुकीला अवघा एक वर्षाचा कालावधी उलटलेला असताना आणि त्या वेळी हिंदुत्वाच्या लाटेचा लाभ मिळालेला असतानाही नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. हा निकाल विद्यमान आमदार चैनसुख संचेती यांच्यासाठी चिंतनाचा विषय ठरला असून, पक्षासाठीही तो मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

याउलट, निवडणुकीपूर्वी गटबाजीने ग्रासलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी हा विजय अत्यंत उल्हासदायक ठरला आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अतिकुर रहेमान जवारीवाले यांनी मिळवलेले प्रचंड मताधिक्य, तसेच माजी आमदार राजेश एकडे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ. अरविंद कोलते, माजी नगराध्यक्ष हाजी रशिदखाँ जमादार यांचे सुक्ष्म नियोजन व समन्वय यामुळे काँग्रेसने भाजपावर निर्णायक मात केली, हे स्पष्ट झाले आहे.

अनुकूल परिस्थिती असूनही भाजप अपयशी

एक वर्षापूर्वी आमदार चैनसुख संचेती यांनी मोठ्या मताधिक्याने मिळवलेला विधानसभा विजय भाजप कार्यकर्त्यांसाठी ‘बुस्टर’ ठरला होता. प्रशासक काळात नगरपालिकेचा कारभारही मोठ्या प्रमाणावर भाजपशी संलग्न कार्यकर्त्यांच्या हातात होता. दुसरीकडे, काँग्रेस पक्षात गटबाजी, इच्छुकांची गर्दी आणि आरक्षणामुळे निर्माण झालेली नाराजी स्पष्टपणे दिसत होती. त्यामुळे निवडणुकीपूर्वी वातावरण तुलनेने भाजप व महायुतीसाठी पोषक मानले जात होते.

Sarangwadi Case : एसआयटी चौकशी केवळ दिखावा ठरणार? सारंगवाडी घोटाळ्यात ‘क्लीन चिट’ची आखणी सुरू!

जातीय समीकरणांचा विचार करता, शहरातील सुमारे ४८ टक्के मुस्लीम मतदार काँग्रेससाठी अनुकूल असले तरी, २०१६ च्या निवडणुकीत एमआयएम व अपक्ष उमेदवारांमुळे झालेल्या मतविभाजनाचा फटका काँग्रेसला बसला होता. याच पार्श्वभूमीवर यंदाही तत्सम प्रयोग करून भाजप विजय मिळवू शकतो, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता.

महायुतीतील विसंवाद भाजपासाठी घातक

मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत महायुतीची एकजूट दिसून आली नाही. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेचे स्वतंत्र उमेदवार नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले. भाजपच्या गटातीलच काही अपक्ष उमेदवार उभे राहिल्याने मतांचे विभाजन झाले. त्यामुळे आमदार चैनसुख संचेती यांना महायुतीची मोट बांधता का आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नांदुऱ्यात ज्या पद्धतीने ताकदीने, सर्व डावपेच वापरत निवडणूक लढवली गेली, तशीच आक्रमक रणनीती मलकापुरात का दिसली नाही, याचीही शहरात चर्चा आहे. विशेष म्हणजे, शहरातील हिंदूबहुल भागातही भाजप अपेक्षित यश मिळवू शकला नाही, हे पक्षासाठी अधिकच चिंताजनक ठरले आहे.

काँग्रेसची रणनीती ठरली निर्णायक

याउलट, निवडणुकीपूर्वी गटबाजीने विभागलेली काँग्रेस ही निवडणूक कशी लढणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र माजी आमदार राजेश एकडे, डॉ. अरविंद कोलते व हाजी रशिदखाँ जमादार यांनी परिस्थितीचा अचूक अंदाज घेत योग्य वेळी अतिकुर रहेमान जवारीवाले यांना उमेदवारी दिली. निवडणूक काळात काँग्रेस पुन्हा एकसंघ झाली.

डॉ. अरविंद कोलते यांचे सुक्ष्म नियोजन, अतिकुर जवारीवाले यांचा निवडणुकीपूर्वीपासूनचा अभ्यास, जातीय समीकरणांचा साधलेला समतोल, शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा आणि कोणत्याही मोठ्या सभांशिवाय केलेला प्रभावी संपर्क यामुळे काँग्रेसने भाजपवर स्पष्ट आघाडी घेतली. आपल्या बहिणीला अविरोध निवडून आणत कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा आत्मविश्वास निर्माण करण्यातही ते यशस्वी ठरले.

Local Body Elections : देऊळगावराजात राष्ट्रवादीचा ‘ओव्हरटेक’; कायंदे ठरले ‘जायंट किलर’

अखेर काँग्रेसच्या एकसंघ प्रयत्नांना यश येत अतिकुर रहेमान जवारीवाले यांनी तब्बल ११ हजार मतांनी विजय मिळवला. यासोबतच १५ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.