Municipal Election 2026: २९ महापालिकांतील २८६९ जागांसाठी ३३ हजारांहून अधिक उमेदवार

Pune tops, Mumbai also in tight race, see how many candidates there are : पुणे अव्वल, मुंबईतही तुफान चुरस पहा कुठे किती उमेदवार

Mumbai: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या अंतिम अहवालानुसार राज्यभरातील २ हजार ८६९ नगरसेवक पदांसाठी तब्बल ३३ हजार ६०६ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी या सर्व महानगरपालिकांसाठी मतदान होणार असून, १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणावर मैदानात उडी घेतल्याने अनेक शहरांमध्ये चौरंगी, पंचरंगी आणि काही ठिकाणी त्याहूनही बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे.

उमेदवारांच्या संख्येच्या बाबतीत पुणे महानगरपालिका राज्यात अव्वल ठरली आहे. पुण्यातील १६५ जागांसाठी सर्वाधिक ३ हजार १७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्याखालोखाल देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईत २२७ जागांसाठी २ हजार ५१६ उमेदवार रिंगणात आहेत. शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी मुंबई आणि पुण्यात मोठी गर्दी झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले.

BMC Election 2026: रामदास आठवलेंनी ३९ उमेदवार उतरवताच १२ जागा देण्यावर सहमती

नाशिक महानगरपालिकेत १२२ जागांसाठी २ हजार ३५६ अर्ज दाखल झाले असून, पिंपरी-चिंचवडमध्ये १२८ जागांसाठी १ हजार ९९३ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ११५ जागांसाठी १ हजार ८७०, सोलापूरमध्ये १०२ जागांसाठी १ हजार ४६०, तर नागपूरमध्ये १५१ जागांसाठी १ हजार ४५२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ठाणे महानगरपालिकेत १३१ जागांसाठी १ हजार १२८, नवी मुंबईत १११ जागांसाठी ९५६, तर वसई-विरारमध्ये ११५ जागांसाठी ९३५ अर्ज दाखल झाले आहेत.

या आकडेवारीवरून राज्यातील बहुतांश मोठ्या शहरांमध्ये तीव्र राजकीय चुरस पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषतः पुणे, मुंबई, नाशिक, पिंपरी-चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये निकालासाठी जोरदार संघर्ष आहे.

ZP Election 2026 : महापालिकेनंतरच जिल्हा परिषद;लवकरच आचारसंहिता

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेपूर्वीच मालेगावमध्ये एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील ‘इस्लाम पक्ष’ने महापालिका निवडणुकीत खाते उघडले आहे. मालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ मधून उमेदवार मुनिरा शेख फकीर मोहम्मद यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाल्याने किंवा माघार घेतल्याने मुनिरा शेख यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. या बिनविरोध विजयामुळे इस्लाम पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मालेगावमध्ये मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
एकूणच २९ महानगरपालिकांतील निवडणुकांमुळे राज्यातील राजकारण तापले असून, १५ जानेवारीच्या मतदानाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.