Municipal election : शिवसेना शिंदे गटाला महापालिका रणधुमाळीत मोठा धक्का

 

Alliance broke up in Ulhasnagar, BJP is on its own, internal discontent is on rise : उल्हासनगरमध्ये महायुती तुटली, भाजप स्वबळावर, अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर

Mumbai : राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजताच सत्ताधारी महायुतीत अंतर्गत विसंवाद, नाराजी आणि तुटफुटीचे चित्र अधिक ठळक होताना दिसत आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे परिसरालगतच्या उल्हासनगरमध्ये थेट महायुतीच तुटल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील जागावाटपावर एकमत न झाल्याने उल्हासनगर महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या १५ जानेवारी रोजी महापालिकांसाठी मतदान होणार आहे . त्याआधी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र ऐनवेळी युती-आघाड्यांचे निर्णय, जागावाटपातील ताणतणाव आणि निष्ठावंतांना डावलून नव्या चेहऱ्यांना तिकीट देण्याच्या प्रकारामुळे अनेक पक्षांमध्ये तीव्र नाराजी उफाळून येत आहे. याचा सर्वाधिक फटका सध्या शिवसेना शिंदे गटाला बसत असल्याचं चित्र आहे.

municipal elections : ‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजप वगळून शिंदे–अजितदादा एकत्र

उल्हासनगरमध्ये महायुती न होण्यामागे दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वातील मतभेद कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे. भाजपचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष राजेश वाधारीया यांनी स्पष्टपणे सांगितले की, महायुतीसाठी दोन वेळा शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला, मात्र तिकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आम्ही ७८ पैकी सर्व जागांवर भाजपचे उमेदवार अर्ज भरणार असल्याचा निर्णय घेतला आहे. या घोषणेमुळे शिवसेना शिंदे गटासाठी ही मोठी नामुष्की मानली जात आहे.

दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाने भाजपशिवाय पक्ष आणि टीम ओमी कलानी यांच्या सोबत ‘दोस्ती’ गटबंधनाची बैठक घेतली आहे. रिजेन्सी हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत ७८ जागांबाबत चर्चा झाली. मात्र भाजपच्या सहभागाबाबत विचारले असता, ठोस उत्तर देण्याचं टाळण्यात आलं. महायुतीबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे घेतील, असं सांगण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर महायुतीचे धागे सैल झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

Kishor jorgewar exposed : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत भूकंप; भाजपाचे आमदार जोरगेवारांच्या पीएच्या पत्नीने भरला अपक्ष अर्ज

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. ठाणे महापालिकेवर पडलेला दरोडा थांबवायचा असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं. काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांच्याशी चर्चा करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि लवकरच महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर केले जातील, असा दावा त्यांनी केला.

मुंबईमध्ये ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची आघाडी, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती, आणि अजित पवार गटाची स्वबळावरची तयारी, हे चित्र जसं आहे, तसंच कमी-अधिक फरकाने राज्यातील इतर महापालिकांमध्येही दिसत आहे. मात्र उल्हासनगरसारख्या ठिकाणी थेट महायुती तुटणं, हे शिंदे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर आणि स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं ठरत आहे.

BMC election : ‘आमच्याकडून विषय संपवला’; संजय राऊतांचे स्पष्टीकरण

एकीकडे सत्ता, पदं आणि अधिकार असतानाही स्थानिक पातळीवर समन्वय साधण्यात अपयश येत असल्याचं चित्र आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी, ऐनवेळी बदललेले राजकीय निर्णय आणि गोंधळलेली रणनीती यामुळे शिवसेना शिंदे गट महापालिका निवडणुकांमध्ये कितपत ताकद दाखवू शकतो, हा प्रश्न आता उघडपणे उपस्थित होत आहे. उल्हासनगरमधील महायुती तुटण्याची घटना ही केवळ एका शहरापुरती मर्यादित न राहता, येत्या काळात शिंदे गटासाठी मोठा राजकीय इशारा ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.