Municipal Election : घराघरात प्रचाराला मुभा दिली का? कोड्यात बोलू नका, हिम्मत असेल तर थेट सांगा

Sanjay Raut direct question to ruling party Election Commission : संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांना आणि निवडणूक आयोगाला थेट सवाल

Mumbai: महाराष्ट्रात निवडणूक प्रचाराची मुदत संपल्यानंतरही सत्ताधारी पक्षांना घराघरात जाऊन प्रचार करण्याची मुभा दिली गेली का, असा थेट आणि गंभीर सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. प्रचार संपल्यानंतर प्रचार संपतो ही वर्षानुवर्षांची परंपरा असताना अचानक नियम बदलून सत्ताधाऱ्यांना ‘नवीन तिळगुळ’ देण्यात आला का, अशी शंका मतदारांच्या मनात असल्याचं राऊत यांनी म्हटलं.

प्रचाराची अधिकृत मुदत काल संपली असतानाही सध्या राज्यात वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी पैशांचं वाटप सुरू असून साड्यांमधून, वृत्तपत्रांमधून पैशांची पाकिटं दिली जात असल्याचे आरोप राऊत यांनी केले. पैसे वाटणाऱ्यांना काही ठिकाणी नागरिकांकडून बदडले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं असून आज दिवसभरात अशा घटनांचं प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Murlidhar Mohol on Ajit Pawar : आरोप सिद्ध झाला तर राजकारणातून निवृत्त होईन

हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण आणि पैशांचं वाटप याशिवाय सत्ताधारी निवडणुका जिंकू शकत नाहीत, असा घणाघाती आरोप करत राऊत म्हणाले की, या लोकांकडे कोणताही विचार नाही. अमाप पैसा वाटप, सत्तेचा गैरवापर आणि प्रशासकीय यंत्रणांचा दबाव याच जोरावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला असून, दिसेल तिथे ठोका, तरच मुंबई, महाराष्ट्र आणि लोकशाही वाचेल, असं त्यांनी सांगितलं असल्याचंही राऊत यांनी नमूद केलं. लोकशाहीच्या रक्षणासाठी अन्याय करणाऱ्यांना रोखलं गेलं, तर लोकशाही नावाची संस्था अशा लोकांना आशीर्वाद देईल, असं विधानही त्यांनी केलं.

आजचा दिवस सत्ताधाऱ्यांसाठी ‘लक्ष्मी दर्शनाचा’ दिवस असून निवडणूक आयोगाने जणू काही त्यांना दान दिल्याचा आरोपही राऊत यांनी केला. पैसा शिंदे गटाकडे, भाजपकडे आणि अजित पवार गटाकडे आहे, हा पैसा नेमका येतो कुठून, हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी काल अजित पवारांनीच शेकडो कोटींच्या फायली मंजुरीसाठी येत असल्याचं विधान केल्याची आठवण करून दिली. हे प्रकार फक्त एकाच गटापुरते मर्यादित नसून शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बाबतीतही हेच चित्र असल्याचा आरोप त्यांनी केला.

Municipal Elections : कुठे कोट्यवधींची रोकड तर कुठे राडे, रात्रभर कोंबिंग ऑपरेशन

निवडणूक आयोग आणि एसीबी काहीही कारवाई करणार नाहीत, असा आरोप करत राऊत म्हणाले की, नेते कोड्यात बोलत आहेत, पण जनतेला कोडी नकोत. हिम्मत असेल तर समोर येऊन थेट बोला, असं आव्हान त्यांनी दिलं. गणेश नाईक यांना उद्देशून कोड्यात बोलू नका, असं सांगत एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असं म्हणताय, तर कोणत्या कारणासाठी जातील, हे स्पष्ट करा, असा सवालही त्यांनी केला.

एकनाथ शिंदेंकडे हरामाचा पैसा आहे आणि तो वाटला जात आहे, असा आरोप जर फडणवीस सरकारमधील मंत्री करत असतील, तर त्यांनी तो उघडपणे जनतेसमोर मांडावा, अशी मागणी राऊत यांनी केली. हे प्रकार म्हणजे उघड ब्लॅकमेलिंग असून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली ही पद्धत चुकीची असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. अजित पवार किंवा गणेश नाईक यांच्याकडे महाराष्ट्राच्या हिताशी संबंधित काही गंभीर माहिती असेल, तर ती लपवून न ठेवता थेट जनतेसमोर आणावी, असं आवाहनही संजय राऊत यांनी केलं.

__