Municipal election : ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जागावाटपावर पेच

Uncertainty about the alliance as no solution was reached in meeting : बैठकीत तोडगा न निघाल्याने युतीबाबत अनिश्चितता

Mumbai: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यातील युती चर्चांना मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत ज्या जागांवर दोन्ही पक्षांचा दावा आहे, त्या जागांवर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे युतीबाबतची चर्चा सध्या तरी फिस्कटल्याचे चित्र दिसत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ला, विक्रोळी आणि धारावी परिसरातील काही प्रभागांवरून मुख्य वाद निर्माण झाला आहे. 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत ज्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते, त्या जागा पुन्हा राष्ट्रवादीला देण्यास शिवसेना ठाकरे गटाने स्पष्ट नकार दिला आहे.

Sudhir Mungantiwar : पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २० हजार बोनस द्या

याच मुद्द्यावरून बैठकीत एकमत होऊ शकले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुरुवातीला शिवसेना ठाकरे गटासमोर 30 जागांचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र ठाकरे गटाकडून केवळ 15 ते 20 जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आली. त्यातही राष्ट्रवादीला अपेक्षित असलेल्या जागा देण्यास ठाकरे गट तयार नसल्याचे स्पष्ट झाले. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता आपला प्रस्ताव काँग्रेस पक्षासमोर मांडल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीत राष्ट्रवादी सामील होण्याची शक्यता सध्या कमी असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची युती अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबईसह राज्यातील सात नगरपालिकांमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत. विशेषतः मुंबई महानगरपालिका ही ठाकरे बंधूंसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि राजकीय अस्तित्वाची लढाई मानली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस युतीत सामील न झाल्यास शिवसेना ठाकरे गट सुमारे 140 ते 150 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे, तर मनसे 60 ते 70 जागांवर उमेदवार देणार आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष युतीत सहभागी झाला, तर शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना 15 ते 20 जागा देण्याचा विचार होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत हा फॉर्म्युला प्रत्यक्षात येण्याची शक्यता कमी दिसत आहे.

Ravi Rana Vs. Balwant Wankhede : ‘राणाच्या थोबाडीत मारली’ गाण्यावरून राजकारण पेटले

बुधवारी दुपारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन युतीची अधिकृत घोषणा करत आहेत. यापूर्वी दोन्ही नेते दादर येथील शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये युतीची घोषणा होण्याची शक्यता असून, याच ठिकाणी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना-भाजप युतीची घोषणा करण्यात आली होती. युतीच्या घोषणेसोबतच जागावाटपाचा फॉर्म्युला आणि उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.