Prahar Party joins Thackeray group, new turn in electoral politics : प्रहार पक्ष ठाकरे गटासोबत, निवडणुकीच्या राजकारणाला नवा वळण
Akola: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून अकोल्यातून एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत युती झाल्याची माहिती समोर आली आहे. एकेकाळी सत्तेच्या राजकारणात दुरावा निर्माण करणारे जुने वाद बाजूला ठेवत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा बच्चू कडूंसोबत हातमिळवणी केल्याचे चित्र दिसत आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अकोल्यात ठाकरे गटाने आपली ताकद वाढवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
Municipal election : विधानसभेत चालते, पण मुंबई महापालिकेत नाही?
सूत्रांच्या माहितीनुसार प्रहार संघटनेचे चार उमेदवार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ‘मशाल’ या निवडणूक चिन्हावर महापालिका निवडणूक लढवणार आहेत. प्रहारचे महानगराध्यक्ष मनोज पाटील हे प्रभाग क्रमांक ८ मधून मशाल चिन्हावर मैदानात उतरणार असून त्यांच्यासोबत प्रहारचे आणखी तीन उमेदवारही याच प्रभागातून निवडणूक लढवणार आहेत. या युतीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, अकोल्यात संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी ठाकरे गटाने हा डाव टाकल्याचं मानलं जात आहे.
याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मनसेसोबत युती जाहीर केली होती. त्यानंतर आता बच्चू कडूंची प्रहार संघटना ठाकरे गटासोबत आल्याने, अकोल्यात ठाकरे गट अधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचं चित्र आहे. महापालिका निवडणुकांत विरोधकांना थेट आव्हान देण्याची रणनीती ठाकरे गटाकडून आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दुसरीकडे अकोल्यात महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही ठोस निर्णय न झाल्याने महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून चर्चेसाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक मैदानात उतरले असून, शिंदे गटाकडून मंत्री संजय राठोड अकोल्यात दाखल होणार असल्याची माहिती आहे. आजच्या चर्चेतून अकोल्यातील महायुतीचं भविष्य ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीतील दोन्ही मित्रपक्षांनी भाजपवर पुरेशा जागा देत नसल्याचा आरोप केला आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी उघडपणे ८० पैकी ३५ जागांची मागणी करत भाजप सन्मान राखत नसल्याचा आरोप केला आहे. रात्री उशिरापर्यंत शिंदे गटाचे उपनेते आणि माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी जागावाटपावर चर्चा सुरू होती. भाजपचा प्रस्ताव ५५ जागा भाजप, १५ शिंदेसेना आणि १० अजित पवार गट असा असल्याने मित्रपक्षांमध्ये असंतोष वाढल्याचं चित्र आहे.
एकीकडे अकोल्यात ठाकरे गट युती वाढवत आपली बाजू मजबूत करत असताना, दुसरीकडे महायुतीतील विसंवाद आणि असंतोषामुळे निवडणूक रणधुमाळी अधिक रंगत जाण्याची चिन्हे दिसत आहेत.








