Mumbai-Pune could become the center of power change : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे ठरू शकतात सत्ता बदलाचे केंद्र
Mumbai : राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला असून, प्रस्थापित दोन आघाड्यांव्यतिरिक्त तिसऱ्या आघाडीची शक्यता आता उघडपणे चर्चेत आली आहे. मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील राजकीय प्रयोग राज्याच्या भविष्यातील सत्तासमीकरणांची दिशा ठरवू शकतात, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. या युतीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, त्याचा परिणाम निवडणुकीतील मतदानावर आणि निकालांवर दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील हा प्रयोग केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरता मर्यादित न राहता राज्यव्यापी राजकारणावर प्रभाव टाकू शकतो, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
Maharashtra politics : आयातांचा बोलबाला मात्र निष्ठावंतांची उपेक्षा !
दुसरीकडे पुण्यातही वेगळ्या प्रकारचे राजकीय समीकरण आकाराला येत असल्याचे चित्र आहे. येथे केवळ दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यापुरते गणित मर्यादित नसून, काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य समन्वयाची चर्चा सुरू आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये या नव्या समीकरणाचे पडसाद उमटू शकतात, अशी शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.
राज्यात एकूण २९ महापालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला असताना महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद अधिक ठळकपणे समोर येत आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सेनेतील युती कायम असली तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला राजकीयदृष्ट्या एकटे पाडले जात असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुन्हा शरद पवार यांच्याशी जवळीक साधण्याचे संकेत दिले असून, राज्यातील राजकीय घड्याळाची काटे वेगाने फिरत असल्याचे दिसत आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनात होईल चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक
मुंबईत काँग्रेसने स्वतंत्र भूमिका घेतली असली तरी पुण्यात मात्र काँग्रेस ठाकरे बंधूंशी हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये ही संभाव्य तिसरी आघाडी अनेक पक्षांची गणिते बिघडवू शकते आणि त्यामुळे राज्याचे राजकारण नव्या वळणावर जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
पुण्यात भाजप आणि शिंदे गटामध्ये जागावाटपावरून खलबते सुरू असतानाच, दोन्ही राष्ट्रवादींमध्येही जागावाटपाचे गणित लवकरच जुळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस, ठाकरे गट आणि मनसे यांचा संभाव्य एकत्रित प्रयोग पुण्यात अनोखे राजकीय समीकरण निर्माण करू शकतो. हा प्रयोग केवळ आगामी महापालिका निवडणुकांपुरता न राहता भविष्यातील विधानसभा आणि लोकसभा राजकारणाची नांदी ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
__








