municipal elections : ‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजप वगळून शिंदे–अजितदादा एकत्र

A complex mix of alliances and coalitions across state in municipal elections : महापालिका निवडणुकांत राज्यभर युती-आघाड्यांचा गुंतागुंतीचा पट

Mumbai: महापालिका निवडणुका २०२६च्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात प्रचंड हालचाली सुरू असून कोणाशी युती करायची आणि कोणाशी आघाडी बांधायची, याचं गणित अद्यापही पूर्णपणे जुळलेलं दिसत नाही. काही महापालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, तर काही ठिकाणी भाजपला बाजूला ठेवत शिंदेसेना आणि अजित पवार गट एकत्र लढताना दिसत आहेत. मुंबईत मात्र चित्र अधिक गुंतागुंतीचं असून उद्धव ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले आहेत, भाजप आणि शिंदेसेना एकत्र आहेत, तर अजित पवार गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीची घोषणा झाली आहे. मुंबई महानगरपालिकेतील २२७ जागांपैकी वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर निवडणूक लढवणार असून उर्वरित जागांपैकी सुमारे १५० जागांवर काँग्रेस उमेदवार देणार आहे. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला सुमारे दहा जागा देण्यात येणार असल्याची माहिती आहे. राज्यातील उर्वरित २८ महापालिकांमध्ये आघाडीबाबत स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार दोन्ही पक्षांनी स्थानिक नेतृत्वाला दिले आहेत.

BMC election : ‘आमच्याकडून विषय संपवला’; संजय राऊतांचे स्पष्टीकरण

राज्यातील विविध महापालिकांमध्ये युती-आघाडीचं चित्र वेगवेगळं दिसून येत आहे. सोलापुरात भाजपच्या विरोधात लढण्याचा निर्णय शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी जाहीर केला असून १०२ पैकी प्रत्येकी ५१ जागा लढवण्याचं ठरलं आहे. अकोल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात आघाडी जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत.

अमरावतीमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना एकत्र येण्याबाबत चर्चा झाली असून दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. चंद्रपूरमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि उद्धवसेना यांची युती ठरली असून दोन्ही पक्ष प्रत्येकी ३३ जागांवर उमेदवार देणार आहेत. जळगावमध्ये मात्र महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाले असून मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेली बैठक काही वेळातच फिस्कटली.

Municipal election : अकोल्यात बच्चू कडू – उद्धव ठाकरे यांची युती

नाशिकमध्ये भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) एकत्र आले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेमध्ये जागावाटपावरून तणाव कायम असून युतीसाठी आतापर्यंत अनेक बैठका होऊनही काही जागांवर एकमत होऊ शकलेले नाही.

Municipal election : विधानसभेत चालते, पण मुंबई महापालिकेत नाही?

दरम्यान, मुंबई महापालिकेतील जागावाटपावरून भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत. काही जागांबाबत अद्याप निर्णय न झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष बैठक होण्याची अपेक्षा होती. मात्र, मुख्यमंत्री नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेल्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही.

एकंदर पाहता, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज्यभर युती-आघाड्यांचा मोठा घोळ निर्माण झाला असून मित्रपक्षही अनेक ठिकाणी परस्परविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. या बदलत्या राजकीय समीकरणांचा अंतिम निकाल मतदार कोणाच्या पारड्यात टाकतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

__