Nagar Parishad Result : मालवण–कणकवलीत शिंदे सेनेचा वरचष्मा!

Nilesh Rane defeats Nitesh Rane; says I am happy, but : निलेश राणेंची नितेश राणेंवर मात; म्हणाले ‘ मला आनंद आहे, पण’

Sindhudurg: कोकणातील बहुचर्चित मालवण आणि कणकवली नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून या निकालांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. राणे विरुद्ध राणे, शिवसेना विरुद्ध भाजप आणि स्थानिक आघाड्या विरुद्ध महायुती असा बहुरंगी सामना असलेल्या या निवडणुकीत अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपवर मात केली आहे. विशेष म्हणजे निलेश राणे विरुद्ध नितेश राणे या भावाभावांतील राजकीय लढतीत निलेश राणे यांनी बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

मालवण आणि कणकवली या दोन्ही नगरपरिषदांवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. निवडणूक काळात पैशांच्या वाटपाचे आरोप, रोख रक्कम जप्ती, तीव्र आरोप-प्रत्यारोप यामुळे ही लढत अधिकच गाजली होती. कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी पैसे वाटपाचा आरोप करत काही लाखांची रक्कम पकडून दिल्याने प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात वातावरण अधिक तापले होते. या पार्श्वभूमीवर लागलेले निकाल हे शिंदे सेनेसाठी मोठे मनोबल वाढवणारे ठरले आहेत.

Sunil kedar : विधानसभेत पत्नी पराभूत, आता 4 पैकी 3 नगरपरिषदा गमावल्या

मालवण नगरपरिषदेत शिवसेनेचे १०, भाजपचे ५ आणि उद्धव ठाकरे गटाचे ५ उमेदवार विजयी झाले आहेत. कणकवली नगरपरिषदेत शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झाले असून भाजपचे समीर नलावडे यांचा पराभव झाला आहे. या निकालांमुळे सिंधुदुर्गात भाजपला धक्का बसला असला, तरी शिंदे गटाची ताकद अधोरेखित झाली आहे.

निकालानंतर प्रतिक्रिया देताना निलेश राणे म्हणाले की, “हा खरा विजय माझा नसून माझ्या सहकाऱ्यांचा आणि सर्व शिवसैनिकांचा आहे. शिंदे साहेबांनी दिलेला आशीर्वाद, पाठिंबा आणि मार्गदर्शन यामुळेच हा विजय शक्य झाला. जिल्हाप्रमुखांपासून शेवटच्या शिवसैनिकांपर्यंत सगळ्यांनी रक्ताचं पाणी केलं.” जनतेने दिलेल्या आशीर्वादाबद्दल आभार मानत त्यांनी २१व्या शतकाला साजेसं शहर घडवण्यासाठी पारदर्शक पावलं उचलणार असल्याचं सांगितलं.

Ramdas tadas, Amar kale: भाजपच्या आजी-माजी खासदारांची मेहनत व्यर्थ, नगरपरिषद गमावली

भाजप आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झालेल्या संघर्षाबाबत बोलताना निलेश राणे म्हणाले की, “निवडणूक जिंकण्यासाठी जे करावं लागतं ते प्रत्येक जण आपापल्या परीने करतो. भाजप माझ्यासाठी वेगळा नाही. मरेपर्यंत भाजप वेगळा मानू शकत नाही. तोही आमचा परिवारच आहे. आज निवडून आलो तो जनतेचा विजय आहे, परिवार अबाधितच राहणार.”

कणकवलीतील निकालावर प्रतिक्रिया देताना त्यांनी दुहेरी भावना व्यक्त केली. “मी एका बाजूला आनंदी आहे, तर दुसऱ्या बाजूला दु:खी आहे. भाजपचा पराभव झाला याचं दु:ख आहे, कारण तेही आमचेच आहेत. मी कधीही कोणाचा पराभव साजरा करणारा माणूस नाही,” असं सांगत त्यांनी विजयी उमेदवार संदेश पारकर यांचं अभिनंदन केलं.
मालवणमध्ये अपेक्षेप्रमाणे सर्व २० पैकी २० जागा जिंकता न आल्याबाबत निलेश राणे म्हणाले की, “२० पैकी २० जागा जिंकण्याचा इरादा होता. कुठे कमी पडलो याचं आत्मपरीक्षण करु.”

Municipal council results : खडसे ते गुलाबराव, पटेल ते बोरनारे… दिग्गजांना गावगाड्यात धक्का

या मोठ्या विजयानंतर निलेश राणे यांना मंत्रिपदाचं प्रमोशन मिळणार का, अशी चर्चा सुरू झाली असताना त्यांनी या प्रश्नावर मिश्कील उत्तर दिलं. “माझ्या घरात नितेशच्या रूपाने एक मंत्रीपद आहे, त्यात मी समाधानी आहे,” असं म्हणत त्यांनी चर्चेला पूर्णविराम दिला.

एकूणच मालवण–कणकवली नगरपरिषद निकालांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली असून शिंदे सेनेचा आत्मविश्वास वाढवणारे हे निकाल आगामी जिल्हा परिषद आणि विधानसभा राजकारणासाठी महत्त्वाचे संकेत देणारे ठरत आहेत.