Tiranga Yatra to salute soldiers : केदार, बर्वेंची दांडी; तिरंगा यात्रेच्या नियोजनाला अनुपस्थित
Nagpur लोकसभा निवडणूक आटोपून एक वर्ष उलटले. विधानसभा निवडणुकीलाही अर्धे वर्ष होत आले. मात्र, काँग्रेसमधील धुसफुस अद्याप कायम आहे. मंगळवारी आयोजित शहर व जिल्हा काँग्रेसच्या बैठकीला खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार यांनी दांडी मारली. केदारांचे समर्थकही यावेळी अनुपस्थित होते, हे विशेष.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक करण्यासाठी नागपूर शहर काँग्रेस व जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे आज, बुधवार, दि. २१ मे रोजी राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी तिरंगा यात्रा काढली जाणार आहे. मात्र याच्या नियोजनासाठी काढण्यात आलेल्या बैठकीला माजी मंत्री सुनिल केदार यांचे समर्थक अनुपस्थित होते. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये ऑल इज वेल नसल्याचेच संकेत मिळाले आहेत.
तिरंगा यात्रेच्या नियोजनासाठी मंगळवारी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण काँग्रेसची बैठक झाली. बैठकीला माजी आ. एस. क्यू. जमा, प्रदेश महासचिव तक्षशीला वाघधरे, प्रसन्ना तिडके, श्रीराम काळे, राहुल घरडे, तुळशीराम काळमेघ, नाना कंभाले, अरुण हटवार, उपासराव भुते, किशोर मिरे आदी उपस्थित होते.
या बैठकीत बुधवारी सायंकाळी ५ वाजता कामठी येथे ‘याद करो कुर्बानी, जय हिंद’ या संकल्पनेवर तिरंगा यात्रा काढण्याचे ठरले. नागपूरचे निरीक्षक माजी मंत्री रणजीत कांबळे हे मंगळवारी आयोजित जिल्हा काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित नव्हते. ते ३० मे रोजी नागपुरात दाखल होऊन बैठक घेणार आहेत, असे आष्टनकर यांनी बैठकीत स्पष्ट केले.
जिल्हा काँग्रेसच्या बैठकीला यावेळीही माजी मंत्री सुनील केदार यांच्या बहुतांश समर्थकांची अनुपस्थिती होती. खा. श्यामकुमार बर्वे हे मंगळवारच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्यामुळे ही बैठक पुढे ढकलावी, अशी केदार समर्थकांची सूचना होती. मात्र, बैठकीचे निरोप आधीच दिले गेले असल्यामुळे बैठक नियोजित तारखेला घेण्यात आली.
नागपूर शहर काँग्रेसतर्फे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी ९ वाजता भारतमाता चौकात जयजयकार करून तिरंगा यात्रेला सुरुवात होईल. विदर्भ चंडिका, शहीद चौक, इतवारी येथे समारोप होईल.