Potholes on flyover before inauguration, disaster averted : निकृष्ट बांधकामाचा नमुना; खड्ड्यांचे व्हिडिओ व्हायरल
Nagpur नागपुरातील एक उड्डाणपूल बांधून तयार होता. काही दिवसांपासून त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त टळत होता. त्यामुळे उद्घाटनाची प्रतिक्षा कायम होती. अशात दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने नागपूरची दाणादाण झाली. त्यातच हा उड्डाणपूल खचला. वाहतूक सुरू नसल्यामुळे अनर्थ टळला, पण त्याचवेळी निकृष्ट बांधकामाचा नमुनाही बघायला मिळाला.
नागपुरातील गवळीपुरा, यादव नगर परिसरात उभारण्यात आलेला हा उड्डाणपूल आहे. पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही भाग खचल्याची धक्कादायक घटना घडली. निकृष्ट बांधकामामुळे हा प्रकार घडला असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Farmer Suicide : कैलास नागरे आत्महत्याप्रकरणी सरकारचा ‘यू-टर्न’?
या पुलावरून रहदारी सुरू झाली असती तर मोठी दुर्घटना झाली असती. सुदैवाने उद्घाटन न झाल्याने ती टळली आहे. मोठमाठे खड्डे पडलेल्या पुलाचा व्हिडिओ एका नागरिकाने सोशल मीडियावर शेअर केला असून, तो प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये पुलाचा काही भाग खोलवर खचलेला स्पष्ट दिसतो. यामुळे बांधकामाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असली तरी निकृष्ट कामामुळे या विकासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. यातून कंत्राटदाराचा निष्काळजीपणा पुढे आला आहे. सार्वजनिक पैशातून उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पांमध्ये अशी अनियमितता होत असल्याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
हा सार्वजनिक निधीचा अपव्ययच नाही, तर हा लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या पुलाचे तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. याकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. पायाभूत सुविधांच्या विकासकामात पारदर्शकता ठेवण्याची मागणी होत आहे.