Lakhs of commuters travel by Nagpur Metro regularly : सर्वच वयोगटातील नागरिकांची मेट्रो प्रवासाला पसंती
Nagpur नागपूरला कशाला हवी मेट्रो. झाली तरी प्रवासी मिळणार नाहीत. अशा चर्चा सुरुवाताला कानी पडायच्या. प्रकल्प सुरू झाला तेव्हा प्रवासी संख्या तुलनेने कमी होती. मात्र आता पूर्ण क्षमतेने मेट्रो धावायला लागली आहे. त्यामुळे नागपूरकरांनी या सर्व चर्चा खोट्या ठरविल्या, असं म्हणायला हरकत नाही. हा प्रकल्प आता शहरासाठी जीवनवाहिनी बनत चालला आहे. मेट्रोचा प्रवास आता सर्वच वयोगटातील प्रवाशांसाठी अंगवळणी पडला आहे.
विद्यार्थ्यांना मेट्रो सहज उपलब्ध व्हावी यासाठी २४ जूनपासून महामेट्रोने मेट्रोच्या फेऱ्यात वाढत केली. १५ मिनिटांनी धावणारी मेट्रो दर दहा मिनिटांच्या अंतराने धावायला लागली. प्रवाशी संख्येतही वाढ झाली आहे. दिवसाला ६५ ते ७० हजार प्रवाशी संख्येवरून आता दिवसाला ८० हजारांपेक्षा अधिक प्रवासी मेट्रोने प्रवास करू लागले आहे. २४ जूनपूर्वी दिवसाला मेट्रोच्या ३०४ फेऱ्या होत होत्या. यात वाढ झाल्याने दिवसाला ५२ फेऱ्यांची वाढ होऊन ही संख्या ३५६ झाली आहे.
Nitin Gadkari : टॉयलेट बांधण्यासाठीच परवानगी घेणे बाकी राहिले आहे
मेट्रोची सेवा सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत सुरू असते. २४ जून पासून नागपूर मेट्रोच्या खापरी, ऑटोमोटिव्ह चौक, प्रजापती नगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन या चारही टर्मिनल स्टेशनवरून मेट्रो सेवा सकाळी ८ ते रात्री ८ वाजता दरम्यान दर १० मिनिटांनी उपलब्ध झाली आहे. इतर वेळी १५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो सेवा उपलब्ध आहे.
महामेट्रोने तिकिटींच्या दरातही ३३ टक्क्यांनी कपात केली आहे. विद्यार्थ्यांना महाकार्डवर मिळणाऱ्या ३३ टक्के सवलतीशिवाय नव्या संरचनेनुसार ५० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. तिकीट दर कमी केल्याने मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले. महामेट्रोने प्रवाशांसाठी व्हाट्सअॅप तिकीट सेवा सुरू केली. यामुळे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नसून प्रवाशांचा वेळ वाचतो.
तिकिटांसाठी लागणाऱ्या कागदाचीही यामुळे बचत होते. दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर प्रवाशी संख्येत मोठी वाढ होणार असल्याचा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर यांनी व्यक्त केला.
प्रवासी झाले हायटेक
महामेट्रोचे प्रवासीही आता हायटेक झाले असून कॅशलेस प्रवास करण्याकडे दिवसेंदिवस भर वाढत चालला आहे. एक लाखांपेक्षा अधिक नागपूरकरांकडे महाकार्ड असून ते याचा वापर करू लागले आहेत. प्रवास अधिक सोईचा व्हावा यासाठी महामेट्रोकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. यात मोबाइल अॅप, ऑनलाइन पेमेंट आणि महाकार्डसह अनेक पर्याय उपलब्ध आहेत.