AIMIM–Muslim League alliance, to get place in standing committee : नागपूर महापालिकेत स्वीकृत व स्थायी समितीत मिळणार स्थान
Nagpur नागपूरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच निवडून आलेल्या एमआयएम आणि मुस्लिम लीगच्या नगरसेवकांनी अखेर आपसात युती केली. तशी नोंदणीही विभागीय आयुक्तांकडे केली आहे. आता त्यांच्या गटाच्या नगरसेवकांची संख्या १० झाल्याने महापालिकेत एक स्वीकृत सदस्य आणि स्थायी समितीत एका नगरसेवकाची वर्णी लागणार आहे. यामुळे एका अतिरिक्त स्वीकृत सदस्यासाठी सुरू असलेले काँग्रेसचे प्रयत्न धुळीस मिळाले आहेत.
नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमचे सहा तर मुस्लिम लीगचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. दोन्ही गटांनी स्वतंत्र नोंदणी केली होती. मात्र, स्वीकृत सदस्य आणि स्थायी समितीसाठी लागणाऱ्या बेरजेचे गणित लक्षात येताच दोन्ही गटांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर महापालिकेत एकूण ५ सदस्यांना स्वीकृत म्हणून पाठवण्याची सोय आहे. यासाठी नगरसेवकांची संख्या आवश्यक आहे. (टीप: १५ नगरसेवकांमागे एक स्वीकृत सदस्य असा कोटा निश्चित झाला आहे). भाजपचे १०२ नगरसेवक निवडून आले आहेत. प्रत्येक स्वीकृत सदस्याच्या नियुक्तीसाठी १५ नगरसेवकांची गरज भासणार आहे.
भाजपकडे असलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार त्यांचे ६ सदस्य स्वीकृत नगरसेवक होतील. काँग्रेसचे ३४ आणि उद्धव ठाकरे सेनेचे चार नगरसेवकांनी एकत्रित गट नोंदणी केली आहे. ३८ नगरसेवकांच्या संख्येनुसार २ स्वीकृत सदस्य काँग्रेस आघाडीकडे जाणार आहेत. त्यानंतरही काँग्रेसकडे आठ नगरसेवकांचा कोटा शिल्लक राहतो. एमआयएमचे सहा नगरसेवक असल्याने दोन्ही पक्षांत टाय झाला असता. त्यासाठी ईश्वर चिठ्ठी काढावी लागली असती.
Cabinet meeting : मंत्रिमंडळाचा धडाका; एका बैठकीत 19 महत्त्वाचे निर्णय !
त्यात कोणाचेही नशीब फळफळून आले असते. मात्र, एमआयएम आणि मुस्लिम लीग एकत्रित आल्याने ईश्वर चिठ्ठीचा विषय आता संपला आहे. सर्वाधिक नगरसेवक असलेला तिसरा पक्ष म्हणून या गटाला एक स्वीकृत सदस्य द्यावा लागणार आहे. १६ सदस्यांच्या स्थायी समितीसाठी १० नगरसेवकांचा कोटा आवश्यक आहे. वाढलेल्या संख्येमुळे या गटाच्या एका सदस्याचा स्थायी समितीमध्ये आपसूकच समावेश होणार आहे.








