Clogged sewer lines causing health hazard : मुख्यमंत्र्यांच्या शहरातील विदारक वास्तव; आरोग्याला धोका
Nagpur शहरात ज्या भागांमध्ये सर्वाधिक रुग्णालये आहेत, तेथेच सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या तुंबल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या आकडेवारीवरून हे विदारक वास्तव पुढे आलं आहे. धंतोलीसारख्या रुग्णालयांनी गजबजलेल्या भागामध्ये ही अवस्था असल्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातील ही परिस्थिती चिंताजनक असल्याची भावना आता निर्माण होत आहे.
नागपुरात सांडपाणी वाहिन्या तुंबल्याच्या 523 तक्रारी नागपूर महानगरपालिकेला प्राप्त झाल्या. पण पालिकेचा सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग हा एक अजबगजब विषय आहे. कुणावर कारवाई करायची, कोणती कामे प्राधान्याने करायची, याचा क्रम लावण्यात हा विभाग पटाईत आहे. काम करण्यात काही ‘अर्थ’ असेल तर हा विभाग काम करतो, अन्यथा मोठ्या आदेशाची वाट बघतो. हे केवळ सार्वजनिक आरोग्य विभागाचेच नाही तर महापालिकेतील प्रत्येक विभागाची हीच परिस्थिती आहे. त्यातल्या त्यात प्रशासकीय कारभार असल्यापासून तर कुणाला ऐकायचे नाही, हेच अधिकाऱ्यांनी ठरविले आहे.
काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत जनता दरबार घेतला होता. यावेळी गडकरींनी अधिकाऱ्यांची घेतलेली झाडाझडती नागपुरात चर्चेचा विषय होता. पण त्यानंतर काही दिवसांतच सारंकाही जैसे थे झालं. पुन्हा नागरिकांच्या तक्रारींची संख्या वाढली. सांडपाणी तुंबायला लागले. जलवाहिन्या फुटलेल्या आहेत. नाल्यांची स्वच्छता नाही. रस्ते अर्धवट बांधून सोडून दिलेले आहेत. असंख्य तक्रारींचा डोंगर नागपुरात आहे. त्यामुळे आता सांडपाण्याच्या तक्रारींचे काय होणार, याची उत्सुकता लागलेली आहे.
Vijay Wadettiwar : वाल्मिक कराडच्या जीवाला सत्ताधाऱ्यांकडूनच धोका !
पालिकेकडे आलेल्या 523 तक्रारींपैकी 385 तक्रारी अजूनही कायम आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि सार्वजनिक आरोग्य विभागाला सुनावलेही. पण या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेली संसाधनेच विभागाकडे नाहीत, ही चमत्कारिक बाब अचानक लक्षात आली. घनकचरा विभागाकडे आवश्यक तांत्रिक साधने नसल्याने त्यांच्याकडे सर्व तक्रारी आरोग्य अभियांत्रिकी विभागाकडे पाठवण्यात येतात. मग आरोग्य विभाग फक्त तक्रारींकडे बघतो, पण तो पुढच्या आदेशांची वाट बघतो.
फक्त 89 तक्रारी सोडवल्या
महापालिकेच्या सर्व झोनमधून 523 तक्रारी आल्या होत्या. मात्र, यातील केवळ 89 तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत. तर 49 सोडवण्याचे काम सुरू आहे. यामध्ये धंतोली झोनमध्ये सर्वाधिक 101 तक्रारी आहेत. यातील केवळ 10 तक्रारी सुटल्या आहेत आणि 89 कायम आहेत. लक्ष्मीनगरमध्ये 97 तक्रारी असून यातील 37 सुटल्या आणि 38 कायम आहेत. इतर झोनमध्येही अशीच स्थिती कायम आहे.








